कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प गुरुवारी (दि. २२) मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह सर्व विभागांचा आढावा घेतला. गतवर्षी जिल्हा परिषदेचा २७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता.
यंदा तो ३० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. येथील समिती सभागृहात मंगळवारी दुपारी दोन तास झालेल्या बैठकीत अध्यक्षा महाडिक यांनी प्रत्येक विभागाने खर्च केलेला निधी आणि आगामी आर्थिक वर्षातील नियोजन याची माहिती घेतली.
यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती अंबरिष घाटगे, सर्जेराव पाटील पेरिडकर, विशांत महापुरे, शुभांगी श्ािंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.काही विभागांचा निधी शिल्लक राहणार आहे त्याचा विनियोग कसा करायचा याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. अनेक नावीन्यपूर्ण तसेच जिल्हा परिषदेचे उत्पन्नवाढीसाठीच्या योजनांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये काही विभागांच्या निधीचे पूर्ननियोजन करण्यात आले आहे. हा निधीदेखील तातडीने खर्च व्हावा, यासाठीही यावेळी चर्चा करण्यात आली.
फॉर्म वाटण्याची घाईसमाजकल्याण आणि महिला बालकल्याण विभागाकडे निधी वाढवून देण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेने परवानगी दिल्यानंतर आता वैयक्तिक लाभाच्या योजनांचे फॉर्म वाटण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
आढावा बैठकीनंतर अध्यक्षांच्या दालनामध्ये सर्व सभापतींसह गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे यांनी चर्चा केली. अधिकाऱ्याऐवजी सदस्यांच्या माध्यमातूनच या लाभाच्या योजनांचे फॉर्म वाटप व्हावे, असे ठरल्याने आता या फॉर्म वाटपाची घाई सुरू झाली आहे.
सदस्यांना १ लाख जादा मिळण्याची शक्यतावर्षभरातील खर्च न झालेल्या निधीचे एकत्रितकरण करून यातून सदस्यांना विकासकामांसाठी आणखी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे समजते. याआधी त्यांना ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.