कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून पुरस्कार पटकावला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी ही घोषणा केली. या पुरस्कारामुळे जिल्हा परिषदेच्या गुणवत्तापूर्ण कामावर पुन्हा एकदा मोहोर उमटली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि कल्पक आणि सामान्यांना पाठबळ देणाऱ्या नावीन्यपूर्ण योजना या बळावर जिल्हा परिषदेने ही बाजी मारली आहे. कागल पंचायत समितीनेही राज्यात उत्कृष्ट पंचायत समिती म्हणून दुसरा क्रमांक पटकावला.
गेल्या पंधरवड्यात राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने जिल्हा परिषदेचे मूल्यांकन केले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी पुरस्कारांचे वितरण होत असते. त्यामुळे बुधवारी रात्रीपर्यंत हा निकाल जाहीर होईल, यासाठी अधिकारी प्रतीक्षेत होते. यवतमाळ जिल्हा परिषद स्पर्धेत होती. मात्र अखेर एकूण मूल्यांकनामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने बाजी मारली. ३० लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यवतमाळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.
राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये कुडाळ, कागल आणि भंडारा पंचायत समितीने अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. कागल पंचायत समिती १७ लाख रुपयांच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. पुणे विभागामध्ये कागल आणि गडहिंग्लज पंचायत समितीने पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे. यशवंत पंचायत राज अभियान २०२०-२१ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०) अंतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी १२ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही.
चौकट
विभागस्तरीय पुरस्कारांचीही घोषणा
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. याअंतर्गत कोकण विभागात कुडाळ (जि. सिंधुदुर्ग), मालवण (जि. सिंधुदुर्ग), सुधागड-पाली (जि. रायगड), नाशिक विभागात राहाता (जि. अहमदनगर), नाशिक (जि. नाशिक), कळवण (जि. नाशिक), पुणे विभागात कागल (जि. कोल्हापूर), गडहिंग्लज (जि. कोल्हापूर), माढा/कुर्डूवाडी (जि. सोलापूर), औरंगाबाद विभागात लातूर (जि. लातूर), नांदेड (जि. नांदेड), शिरुर अनंतपाळ, अमरावती विभागात अचलपूर (जि. अमरावती), दर्यापूर (जि. अमरावती), राळेगाव (जि. यवतमाळ), तर नागपूर विभागात भंडारा (जि. भंडारा), पोभुर्णा (जि. चंद्रपूर), कामठी (जि. नागपूर) या पंचायत समित्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार पटकावले. या पंचायत समित्यांना प्रत्येक विभागात अनुक्रमे ११ लाख रुपये, ८ लाख रुपये आणि ६ लाख रुपये तसेच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल.