कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोनाकाळात केलेल्या औषध खरेदी आणि त्याच्या फायली गायब प्रकरणप्रश्नी आज, बुधवारी मुंबईत आरोग्य विभागात आयुक्त ए. एस. नाईक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. त्यामध्ये औषध खरेदी प्रकरणात लेखापरीक्षकांनी नोंदवलेले आक्षेप, तक्रारीवर सुनावणी होणार आहे.‘आरोग्य विभागातील शंभर फायली गायब’ अशा मथळ्याखाली रविवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर शासकीय पातळीवरही या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन सुनावणी लावण्यात आली आहे. सुनावणीनंतर कोणावर काय कारवाई होणार हे स्पष्ट होणार आहे.जि. प. आरोग्य विभागाने कोरोनाकाळात खरेदी केलेली औषधे आणि वैद्यकीय उपकरणातील गैरकारभाराची प्रकरणे पुढे येत आहे. या काळातील वैद्यकीय उपकरणे पुरवलेल्या न्यूटन कंपनीचा अधिकृत परवानाच नसल्याचे पुढे आले आहे. अशा कंपनीला साडेतीन कोटींची बिले देण्यात आली आहेत.या काळात तक्रारी झालेल्या काही फायली गायब आहेत. आताच्या औषध निर्माण अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात कोरोना काळातील शंभर फायली गायब असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशीही अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील औषध घोटाळाप्रश्नी आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 1:34 PM