कोल्हापूर : दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारामध्ये कोल्हापूरजिल्हा परिषद ५० लाख रुपयांच्या प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. बालस्नेही ग्रामपंचायत म्हणून आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीने पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळवीत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी ही घोषणा केली.सन २०२०-२१ या वर्षातील कामकाजावर आधारित मूल्यमापन करण्यात आले होते. वार्षिक अंदाजपत्रक आणि आराखडा यामध्ये सर्व लाभार्थी आणि संबंधित घटकांचा सहभाग, केंद्रीय योजनांचा निधी खर्च करण्याचे प्रमाण, स्वनिधीचा खर्च, स्वउत्पन्न वाढ, महिलांकरिता विशेष योजना, युवकांच्या स्वयंरोजगाराच्या योजनांची अंमलबजावणी, विशेष उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध सभांच्या आयोजनामध्ये महिला लोकप्रतिनिधींचा सहभाग या निकषांच्या आधारे कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे.पंचायत राज दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे राज्यातील कोणत्याही एका विजेत्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला हजर राहून पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीच्या कार्यास प्रोत्साहन देणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. पुरस्काराची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेने दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरणमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकाविला याचा आनंद झाला. आज माझ्या वाढदिनीच हे पुरस्कार जाहीर झाल्याने माझा आनंद द्विगुणित झाला. आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडीसह सर्वच विजेत्या ग्रामपंचायतींचे मी अभिनंदन करतो. - हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री