भीमगोंडा देसाई- कोल्हापूर --ग्रामपंचायतीचे कामकाज आॅनलाईन व पारदर्शी करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई-पंचायतमध्येही (संग्राम) कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात ‘लय भारी’ ठरल्याचे ग्रामविकास विभागाचे उपसचिव वैभव राजेघाटगे यांनी २४ एप्रिल रोजी जाहीर केले आहे. राज्य आणि केंद्र पातळीवरील पुरस्कारानंतर ई-पंचायतमध्येही उत्कृष्ट ठरत पुरस्कारात जिल्हा परिषदेने हॅट्ट्रिक मारली आहे. एका वर्षात सलग तीन पुरस्कार मिळविण्याची दुर्मीळ संधी या जिल्हा परिषदेला मिळाली आहे. उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमाकांचे २५ लाखांचे बक्षीस मिळविले. त्यानंतर केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेंतर्गत उत्कृष्ट ठरल्यामुळे ३० लाखांचे बक्षीस मिळविले. ई-पंचायतमध्येही राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे १ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे. सन २०११ पासून संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र)अंतर्गत ई-पंचायत प्रियासॉफ्ट संगणक प्रणालीतून कार्यान्वित केली. त्याअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम कक्ष’ स्थापन केले आहेत. या कक्षांतून ग्रामस्तरावरील दैनंदिन खर्च, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेची माहिती अद्ययावत करणे, विविध आॅनलाईन दाखले देश-विदेश किंवा कोठूनही कधीही मिळण्याची व्यवस्था केली आहे. या प्रणालीमुळे ग्रामपंचायतीच्या पातळीवर पारदर्शकता येण्यात मदत झाली आहे. सर्व माहिती संगणकचालकांकडून भरून ग्रामसेवकाकडून प्रमाणित केली जात आहे.ई-पंचायत प्रणालीमुळे ग्रामपंचायत स्तरावर चालणारे सर्व कामकाज आॅनलाईन पाहता येते. वेगवेगळ्या योजनांवर केलेला खर्च, गावात मिळणाऱ्या सुविधा, गावातील करमागणीची बिलेही ‘संग्राम.महाआॅनलाईन.गो.इन’ या वेबसाईटवर एका क्लिकवर समजू शकते. टप्प्याटप्प्याने कक्षात ग्रामस्थांची बँक खाती उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, कर्जे व इतर सुविधा दिल्या जात आहेत.या प्रणालीत पहिल्यापासून कोल्हापूर जिल्हा परिषद आघाडीवर राहिले आहे. कोल्हापूरसह चंद्रपूर, सातारा, रत्नागिरी, हिंगोली जिल्हा परिषदांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे सन २०११ मध्ये देशात ई-पंचायतमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे कोल्हापूरसह या चार जिल्हा परिषदांनाही उत्कृष्ट म्हणून एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे. प्रियासॉफ्ट संगणक प्रणालीतून राज्यात ई-पंचायतीअंतर्गत (संग्राम कक्ष) उत्कृष्ट कामगिरीमुळे एक लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. केंद्र आणि राज्य पातळ्यांवरचे तीन पुरस्कार एका वर्षात मिळविण्याचा दुर्मीळ मान कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाला आहे. यामध्ये पदाधिकारी, कर्मचारी यांचे योगदान आहे. - अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जाहीर करण्यास विलंबई-प्रणालीत सन २०११-१२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा पुरस्कार तब्बल वर्षभरानंतर जाहीर करण्याचा मुहूर्त ग्रामविकास विभागाने साधला आहे. इतक्या विलंबाने पुरस्कार जाहीर करण्यामागचे नेमके कारण स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेलाही कळलेले नाही.
पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषदेने मारली ‘हॅट्ट्रिक’
By admin | Published: April 29, 2015 12:55 AM