कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ७६ गटांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृहावरील राजर्षी शाहू सभागृहामध्ये दोन तास ही प्रक्रिया चालली. काहींनी घेतलेले आक्षेप यावेळी नोंदवून घेण्यात आले.निवडणूक तहसीलदार अर्चना कापसे यांनी सुरुवातीला या सर्व प्रक्रियेचे वेळापत्रक वाचून दाखवले. निवडणूक नियोगाच्या सूचनांनुसार सुरुवातीला अनुसूचित जातीसाठीच्या दहा जागा निश्चित करण्यात आल्या. त्या कशा निश्चित केल्या जातील याची माहिती सुरुवातीला देण्यात आली. यासाठी अनुसूचित जातीच्या लोकसंख्येला एकूण ग्रामीण लोकसंख्येने भागून त्याला ७६ जागांनी गुणण्यात आले. त्यानुसार उतरत्या क्रमाने मतदारसंघांची यादी निश्चित करण्यात आली.त्यामध्ये ज्या ठिकाणी याआधी अनुसूचित जातीचे आरक्षणच पडलेले नाही अशा गटांची नावे निश्चित करण्यात आली आणि मग या आरक्षणातील गट उतरत्या क्रमाने अंतिम करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी याच पद्धतीने एक जागा निश्चित करण्यात आली.यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाचे २० गट निश्चित करण्यात आले. यासाठी मागासवर्ग आयोगाने दिलेली टक्केवारी गुणिले ७६ भागिले १०० यानुसार हे गट निश्चित करून यानंतर त्यातील महिलांच्या आरक्षणाचे गट निश्चित करण्यात आले. यासाठी २००२, २००७, २०१२ आणि २०१७ पासूनच्या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी याआधी ते आरक्षण पडलेले नाही याचा विचार करण्यात आला. यानंतर सर्वसाधारण महिलांसाठीच्या गट निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यातून २१ गट खुल्या महिलांसाठी निश्चित करण्यात आले, तर उर्वरित २३ गट हे सर्वसाधारण ठरवण्यात आले.
असे आहे आरक्षणएकूण जागा ७६सर्वसाधारण २३सर्वसाधारण महिला २२नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष १०नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १०अनुसूचित जाती पुरुष ०५अनसूचित जाती महिला ०५अनुसूचित जमाती महिला ०१एकूण ७६७६ पैकी महिला आरक्षण ३८
इथंपर्यंत समजले का
सोडत प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काहींनी लगेचच आक्षेप घेण्यास सुरुवात केली. यानंतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी सूत्रे आपल्याकडे घेतली. यंदा मतदारसंघ वाढले आहेत. त्यामुळे जुन्या मतदारसंघांची रचना आणि नावेही बदललेली आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया कशी करायची याबाबत ज्या पद्धतीने आयोगाकडून सुचना आल्या आहेत, त्यानुसार ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. आता आपण असे करणार आहोत, नंतर असे करणार आहोत असे सांगत प्रत्येक टप्प्यावर इथंपर्यंत समजले का, पुढे जायचे का, अशी विचारणा करत रेखावार यांनी ही प्रक्रिया शांततेत पार पाडली. ज्यांनी आक्षेप घेतले, ते नोंदवूनही घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.‘लोकमत’चे वृत्त खरेजिल्हा परिषदेच्या ७६ जागांपैकी इतर मागासवर्ग प्रवर्गातून किती जागा मिळणार याबाबत जिल्ह्यात संभ्रम होता. १८ जागांपासून ते २१ पर्यंत या जागा असतील असे सांगण्यात येत होते. परंतु, नागरिकांचा मागास वर्ग आरक्षण जाहीर झालेल्या दुसऱ्याच दिवशी केवळ ‘लोकमत’ने २० जागा मिळणार असल्याचे प्रसिद्ध केले होते. त्यावर या सोडतीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले
महाविकास आघाडी की ‘एकला चलो रे....’ची उत्सुकताया निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेससह शिवसेना महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढविणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कदाचित दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना संधी देतील असा अंदाज आहे. गरज पडेल तिथे शिवसेनेची मदत घेतली जाईल. दुसरीकडे भाजप, जनसुराज्य, आवाडे गट एकत्र येतील. सतेज पाटील यांनी संजय मंडलिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्यासोबत असतील असे जाहीर केले होते. त्याबद्दल मंडलिक यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे आणखी काही दिवसांनंतर यातील अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहे. जोपर्यंत राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना होणार नाही तोपर्यंत अनेक गोष्टी अधांतरीच राहणार आहेत.