कोल्हापूर : पन्हाळा रेस्ट हाऊसच्या मुद्द्यावरून शाहूवाडी-पन्हाळा विधानसभेचे रंगलेले राजकारण शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाहावयास मिळाले.डॉक्टर आणि शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत विचारणा, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी स्वनिधीच्या वापरास विरोध, चुका केलेल्या शिक्षकांना पाठीशी घालण्याचा आणि शिक्षकांची वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी पैसे घेत असल्याच्या आरोपाने या सभेत खळबळ उडाली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी शौमिका महाडिक होत्या. त्यांनी कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाले.गणपतराव आंदळकर यांच्यासह मान्यवरांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले. यानंतर आधी विषयपत्रिकेवरील विषय संपवूया आणि मग प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया, असे आवाहन अध्यक्षा महाडिक यांनी केले. त्यानुसार बहुतांश सर्व विभागांचे विषय मंजूर करण्यात आले.स्वनिधीच्या सुधारित पुरवणी अंदाजपत्रकामध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी २५ लाख रुपयांची तरतूद दाखविल्याने या विषयावर खडाजंगी सुरू झाली. केंद्र किंवा राज्यातून पैसा आणा; परंतु स्वनिधीला हात लावू नका, असे सतीश पाटील यांनी सांगितले.युवराज पाटील यांनी जिल्हा नियोजनमधून निधी घ्या. राहुल आवाडे यांनी योजना चांगली; परंतु स्वनिधी संपवू नका, असे सांगितले. यावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या विभागाच्या अधिकारी प्रियदर्शिनी मोरे अनुपस्थित असल्याने अंबरीश घाटगे याबाबत बोलायला उठल्यानंतर त्यांनाही रोखण्यात आले.इतक्यात विजय भोजे यांनी उठून ‘नमामि पंचगंगा’ असा उल्लेख झाल्याने गैरसमज वाढला आहे, असे सांगत ‘चांगले काम आहे, जादा निधी घ्या,’ असे सांगितल्याने पुन्हा वातावरण तापले.
जिल्हा परिषदेने याबाबतीत काहीही योगदान दिले नाही म्हणून ही सुरुवात करूया, असे सांगत अरुण इंगवले यांनी वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. प्रसाद खोबरे, विजया पाटील, पांडुरंग भांदिगरे, सुभाष सातपुते यांनी चर्चेत भाग घेतला. निधी परत गेल्याच्या आरोपानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी याचे स्पष्टीकरण दिले.यावेळी खोटी माहिती भरलेल्या शिक्षकांवर काय कारवाई केली, असा सवाल शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांना करण्यात आला. १०८ जणांनी खोटी माहिती भरली. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता तुम्ही त्यांना पाठीशी घालत आहात, असा आरोप यावेळी घाटगे यांच्यावर करण्यात आला.
सदस्य विजय बोरगे यांंनी प्राथमिक शिक्षण विभागात तुमचे नाव सांगून वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात, असा थेट आरोप केला. यावर तक्रार आल्यानंतर संबंधितांना कडक सूचना दिल्याचे शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले. कुणी कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा अंबरीश घाटगे यांनी दिला.यानंतर पन्हाळा रेस्ट हाऊस एका ठेकेदाराला चालवायला दिले असताना पुन्हा समिती का नेमली? असा प्रश्न हंबीरराव पाटील यांनी उपस्थित केला. पाच वर्षांतून जिल्हा परिषदेला २० लाख रुपये उत्पन्न मिळणार असताना, आता पुन्हा हा ठेका का काढून घेतला जात आहे? अशी विचारणा सतीश पाटील यांनी केली.
सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी, या तक्रारी तुम्ही राजकारणातून करीत असल्याचा आरोप केला. यावेळी सत्तारूढ असलेल्या विनय कोरे यांचे समर्थक आणि सत्यजित पाटील यांच्या समर्थकांमध्ये हा वाद सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.राजवर्धन निंबाळकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना पुन्हा धारेवर धरले. तुम्ही ‘मॅट’मध्ये म्हणणे देताना माझा उल्लेख केला आहे, याची माहिती द्या, असे निंबाळकर यांनी सांगताच लोहार यांनी, न्यायप्रविष्ट बाबीवर मी बोलणार नसल्याचे सांगितले.
यावेळी लोहार यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू असताना शाहूवाडीच्या सदस्यांनी त्यांची बाजू घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ‘औषध घोटाळ्याचे काय झाले?’ अशी विचारणा डॉ. पद्माराणी पाटील यांनी केली; तेव्हा विभागीय चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अरूण इंगवले बोलायला उभे राहिल्यानंतर प्रविण यादव आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.ग्रामपंचायतींना कर्ज, शाहू पुरस्कारांचे वितरण, चंदगड भवन या विषयांवरही चर्चा झाली. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती विशांत महापुरे, वंदना मगदूम, करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, रविकांत आडसूळ, तुषार बुरूड, मनीष पवार, डॉ. योगेश साळे, राजेंद्र्र भालेराव, डॉ. संजय शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.
महाडिक, आवाडे यांच्यात शाब्दिक चकमकप्रदूषणमुक्तीच्या निधीवरून शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी तरतूद करणं चांगलं की वाईट ? तुमचं नेमकं समर्थन कशासाठी असतं? अशी आवाडे यांना विचारणा केली.
आल्याचीवाडीच्या महिलेच्या मृत्यूबाबत विचारणाआजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथील महिलेचा प्रसूतिदरम्यान मृत्यू झाल्याबाबत सभापती रचना होलम आणि सदस्या सुनीता रेडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. गडहिंग्लजच्या १०० खाटांच्या रुग्णालयात डॉक्टर वेळेत उपस्थित नसल्याने हा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. अनिता चौगुले, वंदना जाधव, स्वरूपाराणी जाधव, विद्या पाटील, रोहिणी आबिटकर यांनी डॉक्टरांच्या रिक्त जागांबाबत विचारणा केली.
पाण्यात पडलात तरी सोडणार नाही!यावेळी लोहार यांच्या चौकशीवरून चर्चा रंगली. आरोप करणारेच चौकशी समितीमध्ये कसे? अशीही विचारणा करण्यात आली. तेव्हा ‘तुम्ही समितीला मान्यता दिली आहे. कुणाला पाठीशी घालणार नाही,’ अशी ग्वाही अंबरीश घाटगे यांनी दिली; तर ‘पाण्यात पडलात तरी सोडणार नाही,’ असे सांगून अरुण इंगवले यांनी आपला इरादा स्पष्ट केला.
मला बोलू देणार की नाही?विषयपत्रिकेवरील विषय सुरू असताना ‘जनसुराज्य’चे प्रा. शिवाजी मोरे बोलायला उभे राहिले. मात्र त्यांना थांबविण्यात आले. त्यानंतरही ते बजेटबाबत बोलायला उभे राहिल्यानंतर त्यांना थांबण्यास सांगण्यात आले. तेव्हा ‘तुम्ही मला बोलू देणार की नाही?’ अशी विचारणा प्रा. मोरे यांनी केली.