कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ही माहिती दिली.जिल्हा परिषदेच्या नुक त्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये लोहार यांच्या कारभाराबाबत जोरदार तक्रारी करण्यात आल्या. अनेक सदस्यांनी उदाहरणे देऊन त्यांच्या कामकाजाची पद्धत योग्य नसल्याचे सांगत चौकशीची मागणी केली होती. यावेळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.यानंतर किरण लोहार हे दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेत आले होते. मात्र तेथे काम करण्यास त्यांना शिवदास यांनीच अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या सूचनेवरून मजजाव केला होता. मात्र सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याने याबाबत लोहार यांना लेखी आदेश देणे अडचणीचे ठरले होते.या पार्श्वभूमीवर शिवदास यांच्या एकसदस्यीय समितीच्या माध्यमातून लोहार यांची चौकशी होणार असून, यानंतर शिवदास आपला अहवाल शिक्षण समितीला देणार आहेत. या अहवालावर शिक्षण समिती सभापती आणि सदस्य चर्चा करून अंतिम अहवाल अध्यक्षांना सादर करणार आहेत. यानंतर हा अहवाल सभागृहापुढे सादर करण्यात येणार आहे. त्यांच्याबाबत ज्या तक्रारी प्राप्त आहेत, याबाबत ही चौकशी केली जाणार आहे.तीन सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा तसेच पंचायत राज समिती दौऱ्यावेळी अनुपस्थित राहिल्यावरूनही लोहार यांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. सर्वसाधारण सभेत लोहार यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने अखेर त्यांच्या चौकशीसाठी मंगळवारी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा आदेश निघण्याची शक्यता असून, त्यामध्ये किती कालावधीत ही चौकशी केली जाणार आहे, हे समजून येणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी लागोपाठ चौकशीच्या फेऱ्यातयाआधीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यादेखील वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून या विभागातील दोन वरिष्ठ कर्मचारी, अधिकाऱ्यांना दोन वर्षांपूर्वी पकडले होते. यानंतर तत्कालीन सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी या विभागाची चौकशी लावली होती. शिंदे यांच्यानंतर नियुक्त झालेले लोहार यांचीही आता चौकशी होणार असल्याने हा विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.