कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या गुरूवारी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनेकांना जोरदार झटका बसला. अनेक मान्यवरांना दुसऱ्या मतदार संघांचा शोध घ्यावा लागणार असून काहीजणांना रिंगणाच्या बाहेरच रहावे लागणार आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचाली वेगणार असून इतर मागास दाखल्यासाठी ही आता गडबड सुरू झाली आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतर झाल्यावर ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तो परिते मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. सांगरूळ आणि शिरोली दुमाला हे दोन्ही मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाल्यानेही पाटील, ‘ गाेकुळ ’ चे संचालक बाळासाहेब खाडे आणि माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांची कोंडी झाली. गतवर्षी जेथून सरिता खोत निवडून आल्या होत्या तो उजळाईवाडी मतदारसंघ खुला झाल्याने शशिकांत खोत यांना दिलासा मिळाला आहे. अमर पाटील यांचा शिंगणापूर मतदारसंघ सर्वसाधारण झाल्याने त्यांनाही लॉटरी लागली. वडणगे मतदारसंघ आरक्षित झाल्याने सरपंच सचिन पाटील यांची उमेदवारीची संधी हुकली आहे.गगनबावडा तालुक्यातील दोन्ही जागा सर्वसाधारण महिला झाल्या असून माजी अध्यक्ष बजरंग पाटील आणि भगवान पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य ऐवजी याठिकाणी अन्य पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे.
आजरा तालुक्यातील उत्तूर मतदारसंघात माजी अध्यक्ष उमेश आपटे यांना आरक्षणाचा झटका बसला. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी सभापती वसंतराव धुरे हे नागरिकांचा मागास प्रवर्ग दाखला घेऊन सज्ज आहेत. माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या पत्नी अलका या पेरणोली मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याठिकाणी भाजपतर्फे स्मिता टोपले आणि माजी सभापती उदय पोवार यांच्या पत्नीही रिंगणात उतरू शकतात.गडहिंग्लज तालुक्यात माजी सदस्य हेमंत कोलेकर यांना आरक्षणाचा फटका बसला असून त्यांचा इतर मागास दाखला असला तरच ते आणि विरोधात संग्राम कुपेकर निवडणूक रिंगणात उतरू शकतात. गिजवणे सर्वसाधारण झाल्यामुळे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांना दिलासा मिळाला.
राधानगरी तालुक्यात बांधकाम समितीच्या माजी सभापती वंदना जाधव यांना पुन्हा कसबा वाळवे मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी आहे तर राधानगरी सर्वसाधारण झाल्याने ‘ गोकुळ ’ चे संचालक अभिजित तायशेटे पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.शाहूवाडी तालुक्यातून माजी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांचा मतदारसंघ आरक्षित झाला आहे. सर्जेराव पाटील पेरीडकर यांना पुन्हा संधी मिळाली आहे. बांबवडे येथून विजय बोरगे यांना पुन्हा संधी असून रणवीर गायकवाड ही येथून इच्छुक आहेत.
भुदरगड तालुक्यातून गारगोटी मतदारसंघ खुला झाल्याने राहुल देसाई विरूद्ध अर्जुन आबिटकर अशी लढत पहावयास मिळू शकते. अर्जुन यांच्या पत्नी रोहिणी पिंपळगाव मधून विजयी झाल्या होत्या. तो मतदारसंघ आता आरक्षित झाला आहे. आकुर्डे येथून जीवन पाटील यांच्या पत्नी रिंगणात असतील. शिरोळ तालुक्यात भाजपचे तालुकाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांचा यड्राव मतदारसंघ राखीव झाला आहे. विजय भोजे यांच्या जातीच्या दाखल्यावर केस सुरू असताना आता पुन्हा त्यांचा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाला आहे.चंदगड नगरपंचायत झाल्यामुळे तेथील सदस्य सचिन बल्लाळ यांना गवसे मतदारसंघातून उतरावे लागेल. कल्लाप्पा भोगण यांचा माणगाव मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांचा दाखला नसल्यास त्यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जाते.
कागलमध्ये नविद, वीरेंद्र बाबत उत्सुकता
कागल तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील यांचा कसबा सांगाव सर्वसाधारण राहिल्याने त्यांना दिलासा मिळाला. अंबरिश घाटगे यांचा सिद्धनेर्ली आरक्षित झाला असला तरीही त्यांना बानगे हा नवा मतदारसंघ दिलासादायक असल्याचे मानले जाते. मात्र बोरवडे आणि चिखली हे दोन्ही मतदारसंघ आरक्षित झाल्याने नविद मुश्रीफ आणि वीरेंद्र मंडलिक सर्वसाधारण असलेल्या कापशीचा पर्याय स्वीकारणार का याची उत्सुकता आहे.
खासदार मानेंचा स्वप्नभंगरूकडी मतदारसंघातून पुन्हा एकदा पत्नी किंवा भावाला उमेदवारी देण्यासाठी मतदारसंघातील गावांची मोडतोड केल्याचा आरोप खासदार धैर्यशील माने यांच्यावर झाला होता. परंतु हाच मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाला आहे. ज्येष्ठ सदस्य अरूण इंगवले आणि स्वाभिमानीचे राजेश पाटील यांचा संभाव्य हेर्ले मतदारसंघ ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाला आहे. इंगवले यांनी ओबीसी दाखल्यावर निवडणूक लढवली होती. परंतु त्यांच्या घरातील महिला सदस्यांचा तसा दाखला आहे का हे अजून स्पष्ट झालेले नाही.
शौमिका महाडिक-खवरे लढत शक्य..
हातकणंगले तालुक्यात शौमिका महाडिक यांचा शिरोली आणि प्रसाद खोबरे यांचा कोरोची मतदारसंघ पुन्हा सर्वसाधारण राहिला. महाडिक यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे त्या पुन्हा या निवडणुकीत उतरतात की कोल्हापूर दक्षिण मधून विधानसभेची तयारी करतात याबद्दलही उत्सुकता आहे. शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे हे त्यांच्याविरोधात रिंगणात असतील अशी शक्यता आहे.
राहुल आवाडे कबनूर मधून..राहुल आवाडे यांचा रेंदाळ आरक्षित झाल्याने ते इचलकरंजी शेजारच्या कबनूर मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांची हातकणंगले लोकसभेसाठी भाजपकडूनही तयारी सुरु आहे. माजी सभापती वंदना मगदूम यांचा पट्टणकोडोली आरक्षित झाल्याने माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्या पत्नी मीनल या रिंगणात उतरू शकतात. मात्र एकूणच हातकणंगले तालुक्यात १२ पैकी ९ मतदारसंघ आरक्षित झाल्याने खुल्या गटातील इच्छुकांची कोंडी झाली आहे.