कोल्हापूर : केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेंतर्गत कोल्हापूरजिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. दिल्ली येथे लवकरच होणाऱ्या समारंभामध्ये जिल्हा परिषदेला ३0 लाख रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ही माहिती दिली.केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयाने १६ सप्टेंबर २0१९ रोजी हा पुरस्कार जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेने २0१७/१८ या वर्षामध्ये केलेल्या कामकाजाच्या आधारे या पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केला होता. या अनुषंगाने ७ ते ९ फेबु्रवारी २0१९ या कालावधीत निवास बावा आणि अनिल कुमार यांच्या केंद्रीय पथकाने कागदपत्रांची आणि क्षेत्रस्तरावरील पडताळणी केली होती. यापूर्वी २0१४/१५ रोजीही याच योजनेअंतर्गत जिल्हा परिषद राज्यात पहिली आली होती.प्रशासकीय, सभा कामकाज, त्याचे दप्तर, सदस्यांची उपस्थिती, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरणपुरक गणेशोत्सव, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न, स्वच्छ भारत मिशन, डिजीटल शाळा, स्वच्छ विद्यालय पुरस्कार, शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशाला, डिजीटल रेकॉर्ड रूम, दिव्यांग उन्नती अभियान, बायोगॅस, आधारवड, कॅन्सर सर्व्हेक्षण, महिला बचत गटांचे काम, घरकुल योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड, वॉटर एटीएम, आयएसओ पशुसंवर्धन दवाखाने याची दखल घेत जिल्हा परिषदेला राज्यात अव्वल घोषित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेने सन २0१७/१८ या कालावधीत केलेल्या कामकाजाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याचा आम्हा सर्वांनाच आनंद झाला आहे. माझे सर्व सहकारी पदाधिकारी, सदस्य, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्र योगदानातून या पुरस्काराचे आम्ही मानकरी ठरलो आहोत.शौमिका महाडिकअध्यक्षा, जिल्हा परिषद कोल्हापूर