कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी नोटीस मंगळवारी बजावली आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा सुरू झाली आहे.चव्हाण हे जिल्हा परिषदेत हजर झाल्यापासूनच त्यांच्याबद्दल तक्रारी सुरू झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांपासून इतरांशीही उर्मटपणे बोलणे, एखादा विषयाची माहिती देण्यास विलंब, प्रमुख अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकांना अनुपस्थित राहून प्रतिनिधीला पाठवणे यावरून त्यांच्याविषयीची नाराजी आधीपासूनच व्यक्त होत होती. अजयकुमार माने यांनी अनेकदा बोलावलेल्या बैठकीलाही ते अनुपस्थित राहात होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही तक्रारी झाल्या होत्या.
अशातच मंगळवारी कृषी समितीची बैठक असल्याने अजयकुमार माने यांनी सोमवारी चव्हाण यांना दालनात येण्यासाठी निरोप दिला. परंतु, दुपारी १२ वाजले तरी ते जिल्हा परिषदेत आले नव्हते. माने यांनी त्यांना फोनही केला. परंतु, सायंकाळी सहापर्यंत चव्हाण जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नाहीत. अखेर माने यांनी याबाबत कार्तिकेयन एस. यांना माहिती दिल्यानंतर तातडीने मंगळवारी संध्याकाळीच ही नोटीस काढण्यात आली.आठवड्याच्या पहिल्या दिवशी अभ्यागत आणि लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेत येत असतात. अशावेळी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असतानाही अनुपस्थित राहिल्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा, शिस्त व अपील नियम १९८१ नुसार आपल्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला का पाठवू नये, अशी विचारणा या नोटीसमध्ये केली असून, दोन दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वृत्तपत्रांना पत्रिका देणे जीआरमध्ये नाही१ जुलै रोजी जिल्हा परिषदेत आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वृत्तपत्रांना का दिली नाही, अशी विचारणा पत्रकारांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांना केली होती. तेव्हा माने यांनी चव्हाण यांना बोलावून घेतले. तेव्हा चव्हाण यांनी वृत्तपत्रांना पत्रिका देण्याबाबत शासन आदेशामध्ये काहीही लिहिले नसल्याने मी पत्रिका दिल्या नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले. यावर माने यांनी डोक्यावर हात मारून घेतला.