कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील एस. टी. वर्र्कशॉपमधील गेल्या अनेक वर्षांपासून जमा झालेले भंगार आणि कचºयाचा उठाव न झाल्याने दुर्गंधी, डास आणि कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले. याबाबत वारंवार तक्रार करूनही येथील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी मंगळवारी वर्कशॉपला ‘टाळे ठोक’ आंदोलन केले. प्रशासनाच्यावतीने पंधरा दिवसांत साहित्य हलविण्याची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
एस. टी. महामंडळाच्या ताराबाई पार्क येथील वर्कशॉपमध्ये जिल्ह्यात बारा आगारांमधील जुन्या एस. टी., बस टायर, लोखंडी साहित्य, जळक्या आॅईलची बॅरेल असे साहित्य या ठिकाणी ठेवले जाते. दरवर्षी त्याचा लिलाव करून साहित्य भंगारात काढले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून साठलेल्या साहित्याचा लिलाव करण्यात आलेला नाही. त्यामुळे वर्कशॉपमध्ये ठिकठिकाणी भंगाराचा ढीग पडला आहे. जुन्या टायरमध्ये पाणी साचून राहिल्याने या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे येथील परिसरातील नागरिक व कर्मचाºयांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे तसेच येथील साहित्य गोकुळ शिरगांवमधील एस. टी. महामंडळाच्या जागेत हलवावे, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.
संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिकाणी आंदोलन करत वर्कशॉपच्या गेटला टाळे ठोकले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवसैनिकांनी वर्कशॉपमध्ये फिरून पाहणीसुद्धा यावेळी केली. आंदोलनात शशिकांत बिडकर, रवी चौगुले, राजू यादव, राजेंद्र जाधव, संदीप कारंडे, विनोद खोत, राजेंद्र पाटील, रणजित आयरेकर, सुनील पोवार, शुभांगी पोवार, दीपाली शिंदे, कोमल पाटील, जयश्री खोत आदी उपस्थित होते.