संदीप आडनाईक
कोल्हापूर : लोकप्रिय मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत पन्हाळ्याची ऋचिका खोत कोल्हापुरी बाज राखत उपविजेती ठरली. निवडक १३ स्पर्धकांमधून निवडलेली ऋचिका रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली. महाअंतिम सोहळ्याचा निकाल गुरुवारी रात्री झालेल्या कार्यक्रमातून जाहीर करण्यात आला.ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी या छोट्याशा गावातील ऋचिका खोतने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कोल्हापुरातून केली. शेतकरी वडील असलेल्या राजेश खोत यांनी ऋचिकाला सर्व प्रकारची मदत केली. प्रसंगी शेतीचा तुकडा विकून तिला अभिनयाच्या क्षेत्रात उभे राहण्यास मदत केली. पन्हाळ्यावरील हायस्कूलमधील शिक्षण तिने गावातून चालत जाऊन पूर्ण केले.सन २०१३ मध्ये ऋचिका विवेकानंद महाविद्यालयातील वाणीकौशल्य अभ्यासक्रमात सहभागी झाली. हिमांशू स्मार्त यांनी तिला घडविले. त्यापूर्वी तिने एनएसएस, लघुनाट्ये, पथनाट्ये, कॉलेजच्या मासिकात लिखाण केले होते.
कॉलेजतर्फे शैशवताराचा प्रयोग केला. वाणीच्या नाटकांमधून सर्जनशाळेची बीजे रुजली. ऋचिका मराठी साहित्याची पदवीधर आहे. दोन वर्षांनंतर भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि सर्जनशाळामार्फत ट्रिपल सीट हे पूर्ण लांबीचे नाटक केले. त्यानंतर पुण्याला ललितकला केंद्रात तिने प्रशिक्षण घेतले. नंतर गीतांजली कुलकर्णी यांच्या गोष्टरंगमध्ये तिने लहान मुलांसाठीच्या थिएटरचे शिक्षण घेतले.सर्जनशाळेसोबत उडला माझा टॉक-टाइम नावाच्या विक्षिप्त कॉमेडीमधे तिने वेगळ्या धाटणीची भूमिका केली. चं. प्र. देशपांडे यांची वेषांतर, सतीश तांदळेसोबत सादर केली. ती भालजी पेंढारकर केंद्राच्या विद्यार्थ्यांची आणि सर्जनशाळेतील मुलांची शिबिरे घेत असते. सर्जनशाळेच्या विभावमध्ये तिने अरुण खोपकर यांच्या ललितलेखांचे अभिवाचन केले. त्याचे बेळगाव, सांगलीमध्ये प्रयोग केले.ऋचिकाने आदिकाळोखसारख्या अभिवाचनासाठी संगीत संयोजन केलं. अघोर आणि 'कल्लुरीचा रेडिओ' या सर्जनशाळेच्या नाटकांमधील गाण्यांना चाली दिल्या आणि तरल संवेदनशीलता आणि प्रवाही शैली लाभलेली लेखिका म्हणूनही तिने नाव मिळविले. या स्पर्धेचे परीक्षक संजय जाधव आणि मकरंद देशपांडे तसेच सूत्रसंचालक यांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.