कोल्हापूर : आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिचे मंगळवारी दुपारी चार वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत व हलगीच्या कडकडाटात करवीरच्या क्रीडारसिकांतर्फे ताराराणी चौकात मोठ्या उत्साहात जल्लोषी स्वागत करण्यात आले.जाकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत २५ मीटर पिस्तल प्रकारात कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर ती दक्षिण कोरिया येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना झाली. त्यामुळे तिला तिच्या कोल्हापुरातील राहत्या घरी येता आले नाही. मंगळवारी दुपारी चार वाजता ती मुंबईहून ताराराणी चौकात दाखल झाली.
यावेळी तिचे करवीरनगरीच्या क्रीडारसिकांतर्फे महापौर शोभा बोंद्रे, मधुरिमाराजे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तिच्या राजारामपुरीतील राहत्या घरी आजी वसुंधरा सरनोबत, काकी कुंदा सरनोबत, वहिनी धनश्री सरनोबत, आत्या सुषमा कदम, आदींनी औक्षण करीत स्वागत केले. तिच्यासोबत वडील जीवन सरनोबत, आई प्रभा, भाऊ आदित्य, अजिंक्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, क्रीडाधिकारी सुधाकर जमादार, नगरसेविका सुरेखा शहा, नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, के.एस.ए.चे पदाधिकारी माणिक मंडलिक, संभाजीराव मांगोरे-पाटील, नंदकुमार बामणे, ऋतुराज क्षीरसागर, कमलाकर जगदाळे, माजी नगरसेवक रघुनाथ टिपुगडे, आदी उपस्थित होते.
यावेळी तिच्या शाळेतील शिक्षिका व क्रीडाशिक्षक, उषाराजे हायस्कूलचे ए. यू. साठे, बी. के. चव्हाण, एस. डी. चव्हाण. व्ही. डी. जमेनीस, क्रीडाशिक्षक रघू पाटील, आदी उपस्थित होते.