संतोष मिठारीकोल्हापूर : सण-उत्सव असो की, वाढदिवस उत्साह आणि धडाक्यात साजरा करणे कोल्हापूरकरांचे वैशिष्ट्य आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे निर्माण झालेल्या सामाजिक स्थितीचा विचार करून कोल्हापूरकरांनी वाढदिवस साजरा करण्याबाबत सामाजिक बांधिलकीचे नवे पाऊल टाकले आहे. भुकेल्या, गरजूंना अन्नाचा घास देऊन वाढदिवस साजरा करण्याचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ रुजला आहे. सीपीआर चौकात सुरू असलेल्या कोल्हापूर थाळी उपक्रमांतर्गत गेल्या आठ महिन्यांत १५०० जणांनी वाढदिनी अन्नदान केल्याने अनेकांची भूक भागली आहे. सीपीआर रूग्णालयात येणाऱ्या अनेक नागरिकांना एकवेळचे जेवण मिळत नाही. त्यांची जेवणाअभावी अडचण होत असल्याचे उत्तरेश्वरपेठेतील सामाजिक कार्यकर्ते आणि चांदी व्यावसायिक उदय प्रभावळे यांच्या लक्षात आले. त्यांनी अशा नागरिकांसाठी सीपीआर चौकात ‘कोल्हापूर थाळी’ या उपक्रमांतर्गत गेल्यावर्षी जूनपासून मोफत जेवण सुरू केले. येथे दुपारी साडेबारा वाजता तीनशे जणांना जेवण दिले जाते. अमेरिकेतील अनिवासी भारतीयांच्या नानबान फाउंडेशनची त्यांना मदत होत आहे. अनेकजण त्यांचा आणि कुटुंबातील अन्य सदस्य, मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस, एखाद्याच्या पुण्यस्मरणानिमित्त ‘कोल्हापूर थाळी’ला अगदी पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत देणगी देत ‘कोल्हापूर थाळी’मध्ये सहभागी होत आहेत. महिन्यागणिक त्यांची संख्या वाढत आहे. भुकेल्यांना घास देऊन वाढदिवस साजरा करण्याचा एखाद्याच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ अनुकरणीय आहे.
अशी आहे ‘कोल्हापूर थाळी’एक चपाती, एक वाटी भाजी, आमटी, लागेल तितका भात, गोड पदार्थ (बासुंदी, फ्रुटखंड, जिलेबी, शेवयाची खीर यापैकी)उपक्रमाची व्याप्ती वाढविणारगेल्या आठ महिन्यांपासून रोज तीनशे जणांना मोफत जेवण पुरविण्याचा उपक्रम अखंडपणे राबवित आहे. त्यात सीपीआरमधील रुग्णांच्या नातेवाईकांचे अधिक प्रमाण आहे. रोज जेवण देण्याचा किमान दहा हजार रुपये खर्च येतो. वाढदिवस, पुण्यस्मरणानिमित्त आपल्या परीने काहीजण आर्थिक मदत देतात. त्यातून खर्च भागविला जात आहे. आर्थिक ताकद वाढल्यास ‘कोल्हापुरी थाळी’ उपक्रमाची व्याप्ती वाढविणार आहे.मिरजकर तिकटी, रंकाळा तलाव येथे उपक्रम सुरू करणार असल्याचे उदय प्रभावळे यांनी शुक्रवारी सांगितले. अन्नदान करण्याची इच्छा, तयारी असणाऱ्या नागरिकांनी ‘कोल्हापुरी थाळी’च्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
७३ हजार जणांना अन्नदान
या ‘कोल्हापूर थाळी’ उपक्रमांतर्गत गेल्या आठ महिन्यांमध्ये रोज किमान ३०० याप्रमाणे आतापर्यंत एकूण ७३ हजार ५०० जणांना अन्नदान करून त्यांचे पोट भरण्याचे काम आम्ही केले असल्याचे प्रभावळे यांनी सांगितले.