कोल्हापूर : हलगीचा कडकडाट, कपाळाला कुंकुमतिलक, डोक्यावर कोल्हापुरी भगवा फेटा अशा जल्लोषी वातावरणात राज्यभरातून आलेल्या ४२ सहल संयोजकांचे येथील शाहू स्मारक भवनमध्ये कोल्हापुरी पद्धतीने गूळ-शेंगदाणे देऊन स्वागत करण्यात आले. कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी हे सर्वजण तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कोल्हापूर हॉटेल मालक संघाने या सर्व सहल संयोजकांना कोल्हापूरमध्ये पाचारण केले आहे. शुक्रवारी सकाळी येथे आल्यानंतर दिवसभरामध्ये त्यांनी किल्ले पन्हाळ्याचे ऐतिहासिक वैभव अनुभवले; तर करवीर निवासिनी श्री अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेतले. यानंतर सायंकाळी या सर्वांसाठी करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभय शशांक प्रस्तुत ‘लावण्यसंध्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशवंदना, भूपाळी, वासुदेव गीत, दत्तपंथी भजन, लावणी, शेतकरी गीत यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडविण्यात आले. अभिनेते नितीन कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी यांच्या खुमासदार संवादातून हा कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. उपस्थित सहल संयोजकांनी यावेळी टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांना दाद दिली. खास कोल्हापुरी संवाद आणि पूरक गाण्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनच यावेळी उपस्थितांना अनुभवता आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, कोल्हापूर हा विकासामध्ये अग्रेसर जिल्हा आहे. मात्र पर्यटनक्षेत्रामध्ये येथे खूप काही करण्यासारखे आहे. येथे येणारा पर्यटक, यात्रेकरू कोल्हापुरात एक-दोन दिवसांसाठी राहावा यासाठी आता आमचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेवरून आम्ही तुम्हा सर्व सहल संयोजकांना येथे पाचारण केले आहे. दोन दिवस येथे राहून कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी तुम्ही आम्हांला मार्गदर्शन करावे. महाराष्ट्र टूर आॅर्गनायझर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि वीणा टूर्स अॅँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक सुधीर पाटील म्हणाले, कोल्हापूर आणि परिसराला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. अबुधाबी आणि भोपाळ येथे पर्यटनविषयक उपक्रम असूनही आम्ही बहुतांश सहल संयोजक कोल्हापुरात आलो आहोत. इथल्या पर्यटनवाढीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करू. कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. कोल्हापूर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी यावेळी जिल्हाधिकारी सैनी यांचे, तर सचिव सिद्धार्थ लाटकर यांनी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांचे स्वागत केले. तत्पूर्वी सकाळी हे सर्वजण कोल्हापुरात आल्यानंतर प्रकाश नाट्यकला मंदिरच्या मोहिनी दिवाण यांच्या विद्यार्र्थिनींनी कथ्थक आणि भरतनाट्यम्च्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराव मास्तोळी यांच्यासह हॉटेल मालक संघाचे पदाधिकारी व पर्यटन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) शाहू स्मारक भवनमध्ये कुंभार कला शाहू स्मारक भवन परिसरामध्ये कोल्हापुरी चप्पल, गूळ, चांदीचे दागिने, बुरुडांनी तयार केलेल्या बांबूच्या बुट्ट्यांची मांडणी करण्यात आली होती. सर्वांचे स्वागत गूळ आणि शेंगदाणे देऊन करण्यात आले; तर एक कुंभार बांधवही येथे चाकावर छोटी मडकी तयार करीत होते.
या कोल्हापुरी, स्वागत झाले भारी!
By admin | Published: October 15, 2016 12:59 AM