शिवाजी विद्यापीठ, योगविद्याधाम, पतंजली, जिल्हा योगा संघटना आदींसह अन्य वीस संस्था या कोल्हापूरमध्ये योगप्रचार, प्रसाराचे कार्य करत आहेत. सुमारे अडीच हजार योग शिक्षक कोल्हापूरकरांना योगाची धडे देण्याचे काम करत आहेत. कोरोनामुळे निरोगी आणि सदृढ आरोग्याचे महत्त्व सर्वांना समजले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये व्यायाम अथवा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणे शक्य होत नाही. अशा स्थितीत योगाचा पर्याय अधिक चांगला आहे. योगा करून मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासह प्रतिकारशक्ती वाढविणे शक्य आहे. त्यामुळे योगाकडे कोल्हापूरकरांचा कल वाढला आहे. दरम्यान, स्वत:च्या शरीराला सुस्थितीत ठेवण्यासाठी योगाची मोठी मदत होते. योगामुळे मनाची आणि शरीराची संतुलता राहते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगा महत्त्वाचा ठरतो. त्याबाबत समाजप्रबोधन झाल्याने लोकांचा योगा, प्राणायमाकडे कल वाढला आहे. कोल्हापुरातील याबाबतचे चित्र खूप चांगले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रकांत साखरे यांनी सांगितले.
चौकट
कोरोनामुळे ऑनलाईन प्रशिक्षण
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या सद्यस्थितीमध्ये विविध संस्था, योगशिक्षकांकडून योगा, प्राणायमाचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सूर्यनमस्कार, विविध योगासनांच्या प्रकार शिकण्यासाठी या स्वरूपातील प्रशिक्षण उपयुक्त ठरत आहे.
चौकट
विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले
योगाचा खेलो इंडियामध्ये सहभाग झाला आहे. त्यामुळे एक क्रीडाप्रकार म्हणून योगाचे धडे गिरविण्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. योगामध्ये जिल्ह्यातील काही खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे.
योगशिक्षक काय म्हणतात?
योगामुळे मनाची चंचलता कमी होते. आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. योगा करणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. योगाला प्राणायामाची जोड दिल्यास ते अधिक लाभदायक ठरते.
-सूरज पाटील
कोरोनामुळे लोक हे आरोग्याबाबत अधिक दक्ष झाले आहेत. त्यांचा योगा, प्राणायम करण्याकडे कल वाढला आहे. त्यात ४० वर्षांवरील लोकांबरोबर तरुणाईचे प्रमाणही चांगले आहे.
-रविभूषण कुमठेकर
जिल्ह्यातील योगा दृष्टिक्षेपात
योगाबाबत कार्यरत असणाऱ्या संस्था : २०
प्रशिक्षण देणारे योग शिक्षक : सुमारे २५००