कोल्हापूर : वाढत्या पेट्रोल दरवाढ आणि प्रदूषणावर रामबाण उपाय म्हणून नागरिकांचा पेट्रोलवरील दुचाकी व चारचाकीऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे कल वाढू लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत नऊ चारचाकी व सहा र्ई-रिक्षा आणि ३४१ इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यावर धावू लागल्या आहेत.
राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. उत्पादकांना सवलती व वाहन खरेदी करताना प्रोत्साहनपर सवलत जाहीर केले आहे. यात १० टक्के वाहने ही इंधनाशिवाय एसीसी बॅटरीवर चालणारी उत्पादित करणे, चार्जिंगसाठी विविध ठिकाणी केंद्र स्थापन करणे, याच वाहनांचे रिसायकलिंग मटेरियल मोडीत काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, आदी बाबी सरकार करणार आहेत. तत्पूर्वी कोल्हापूरकरांनी खिशाला न परवडणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला कंटाळून इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत ३४१ दुचाकी, तर ९ चारचाकी या बॅटरीवर चार्ज होऊन चालणाऱ्या खरेदी केल्या आहेत. वाहन खरेदी करताना सरकारने सवलत जाहीर केली आहे. वापरानंतर त्या मोडीत काढण्यासाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत पेट्रोल, डिझेलवर धावणाऱ्या दुचाकी, चारचाकीसह इलेक्ट्रिक वाहनांचाही १० टक्के इतका वाटा वाढणार आहे.
बॅटरीसह पूरक उत्पादनांनाही मिळणार प्रोत्साहन
इलेक्ट्रिक वाहनांचा आत्मा बॅटरी असतो. त्यामुळे बॅटरी उत्पादक कंपन्यांना सरकारने प्रोत्साहन जाहीर केले आहे. तर कंपन्यांनीही विक्री झालेल्या वाहनांना ५० हजार कि.मी अथवा तीन वर्षांची वाॅरंटी दिली आहे. बॅटरीसाठी लागणारे रसायन, पूरक साहित्य अशा कंपन्यांची संख्या वाढणार असून, रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे जाणकार सांगत आहेत.
दोन वर्षांतील ई-वाहनांची आकडेवारी अशी...
२०२० - मोटारसायकल - २०९, चारचाकी -०१, ई-रिक्षा - ६
२०२१- मोटारसायकल - १३२, चारचाकी - ८
कोट
राज्य शासनाने इलेक्ट्राॅनिक धोरण जाहीर केले आहे. न परवडणारी इंधन दरवाढ आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने चांगला पर्याय आहे. त्यामुळे अशी वाहने खरेदीकडे लोकांचाही कल वाढू लागला आहे. - डाॅ. स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर