लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी अन्यायकारक कृषी कायद्याच्या विरोधात उद्या, मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. यात कोल्हापुरातील सर्व संघटना, व्यापारी संस्था, राजकीय पक्षही सहभागी होणार असून, बंद कडकडीत पाळला जाणार आहे. याबाबत सर्व राजकीय पक्ष, संस्था, कामगार संघटना, व्यापारी संस्था, शेतकरी संघटनांची रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या टेंबे रोडवरील कार्यालयात बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शेकापचे माजी आमदार संपतबापू पवार होते.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सर्वजण बिंदू चौकात मंगळवारी सकाळी दहा वाजता जमणार असून, ठिय्या आंदोलन, मोटारसायकल रॅली, शहरात फिरून बंदचे आवाहन केले जाणार आहे.
या आंदोलनाला कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज, सर्वपक्षीय नागरी कृती समिती, काॅमन मॅन संघटना, किरकोळ दुकानदार असोसिएशन, रेशन दुकानदार संघटना, सराफ असोसिएशन, मार्केट कमिटी, हमाल संघटना, लाल बावटा कामगार संघटना, ऊसतोडणी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, कोल्हापूर जिल्हा लाॅरी ऑपरेटर्स असोसिएशन, फेरीवाले संघटना, आदींनी पाठिंबा दिला आहे, तर गडहिंग्लज इचलकरंजी, शिरोळ, वडगांव, गारगोटी, आदी तालुके व बाजारपेठाही या दिवशी बंद ठेवल्या जाणार आहेत. या बैठकीत निमंत्रक नामदेव गावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, किसान सभेचे नेते उदय नारकर, जनता दलाचे रवी जाधव, सर्व श्रमिकचे अतुल दिघे, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चंद्रकांत यादव, गिरीश फोंडे, बाबासाहेब देवकर, वैभव कांबळे, अमोल निकम, प्राचार्य टी. एस. पाटील, वाय. एन.पाटील, बाबूराव कदम, रघुनाथ कांबळे, शिवाजी मगदूम, अजित पोवार, संभाजी जगदाळे, कुमार जाधव, अमोल नाईक, आदी उपस्थित होते.