कोल्हापूर : संपूर्ण देशाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक समतेचा संदेश देणाऱ्या; तसेच मागास वर्गाला जगातील पहिले आरक्षण आपल्या संस्थानात देणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार बांधण्यात आलेल्या त्यांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. १९) माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूरकरांच्या सहकार्यातूून उभारलेले हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक समाजाला पे्ररणा देईल, अशा पद्धतीने येथील नर्सरी बागेत उभारले आहे.
करवीरनगरीने हा लोकार्पण सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार केला असून, सलग चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. लोकार्पण सोहळ्यास श्रीमंत शाहू छत्रपती, मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर उपस्थित राहणार आहेत.मृत्यूनंतर आपले समाधी स्मारक नर्सरी बागेत बांधले जावे, असे इच्छापत्र खुद्द शाहू महाराज यांनी लिहून ठेवले होते. कोल्हापुरातील काही शाहूप्रेमींनी याबाबत पुरावे दिले होते. त्यानुसार समाधी स्मारक उभारण्यात आले आहे.
शाहूंच्या सामाजिक विषमता दूर करण्याच्या ऐतिहासिक पर्वातील ‘हिरो’ ठरलेल्या कै. गंगाराम कांबळे यांच्या शाहू भक्त प्रसारक सोमवंश मंडळाने महाराजांचे छोटे समाधी स्मारक नर्सरी बागेत बांधले; परंतु काळाच्या ओघात ते नामशेष झाले. यानंतर शाहूप्रेमींच्या मागणीनंतर महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी या कामासाठी प्राधान्य देत स्वनिधीतून स्मारक उभारले.समाधी स्मारकाविषयी थोडक्यात
- एकूण खर्च - २ कोटी ८० लाख
- चबुतरा व मेघंडबरी- एक कोटी रुपये
- संरक्षक भिंत- एक कोटी १० लाख
- लॉन, विद्युत रोषणाई, दगडी फरशी- ७० लाख
- कामाचे ठेकेदार- व्ही. के. पाटील
- आर्किटेक्चर- अभिजित जाधव, कसबेकर
- मेघडंबरीचे शिल्पकार- किशोर पुरेकर
समाधी स्मारकाची वैशिष्ट्ये
- शेकडो वर्ष टिकेल असे समाधी स्मारक
- स्मारकस्थळी बांधण्यात आलेल्या चौथऱ्याचे संपूर्ण काम काळ्या घडीव दगडात, अतिशय मजबूत.
- तीन टनांची ब्राँझची मेघडंबरी १६ फूट उंचीची असून, तिची लांबी-रुंदी सात फूट बाय सात फूट.
- छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे आजोबा राजाराम महाराज यांची समाधी इटलीत बांधली असून, त्यावर उभारलेल्या मेघडंबरीची प्रतिकृती नर्सरी बागेतील समाधी स्मारकासाठी निवडण्यात आली.
- न्यू पॅलेस, जुना राजवाडा येथील खांबाचे नक्षीदार काम मेघडंबरीच्या खांबांवर कोरण्यात आले.