कोल्हापूर : फटाक्यांची आतषबाजी, गणपतीबाप्पा मोरया आणि अनिकेतसोबत ‘सेल्फी’साठी बालचमूंची सुरू असलेल्या झुंबड अशा कोल्हापुरी वातावरणात शनिवारी रात्री भारतीय फुटबॉल खेळाडू अनिकेत जाधवचे क्रीडाप्रेमींनी त्याच्या घरी जल्लोषी स्वागत केले. भारतीय संघाचा तिन्ही सामन्यांत पराभव झाल्याने थोडासा निराश झालो होतो. मात्र, कोल्हापूरकरांनी केलेल्या जल्लोषी स्वागतामुळे आणि लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळे मला पुन्हा नवऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया अनिकेतने यावेळी व्यक्त केली.
कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत अनिल जाधव याची भारतात सुरू असलेल्या ‘फिफा’ १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने संपल्यामुळे शनिवारी तो आपल्या घरी परतला. रात्री आठच्या सुमारास शाहूपुरीतील आपल्या घरी आल्यानंतर फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकांनी एकच जल्लोष केला.
फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी बालचमूंनी तर ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत त्यांचे स्वागत केले. अनिकेतच्या आई व नातेवाइकांनी त्याचे औक्षण करून त्याला घरात घेतले. या ठिकाणी मधुरिमाराजे यांनी त्याला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.रात्री उशिरापर्यंत त्याला शुभेच्छा देण्यासाठी क्रीडाप्रेमी, मान्यवरांनी गर्दी केली होती. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, ‘केएसए’चे राजेंद्र दळवी, संभाजीराव मांगुरे-पाटील, प्रहार संघटनेचे अफजल देवळेकर-सरकार, नंदकुमार सूर्यवंशी, संतोष हराळे, राजाराम गायकवाड, लालासो गायकवाड, संजय आवटे, राजे मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय संघात निवड होणे अभिमानास्पद होते. अतिशय कौशल्याने सामन्यात प्रदर्शन केले. मात्र, तिन्ही सामन्यांत संघाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे थोडीशी मरगळ आली होती; मात्र कोल्हापुरात आल्यावर मोठ्या उत्साहात आबालवृद्धांनी स्वागत केले. शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. त्यामुळे मला नवऊर्जा मिळाली आहे.- अनिकेत जाधव