कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूरकरांचा केलेला अपमान आणि एक लाख साड्या वाटप या दोन गोष्टी ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पाठ सोडणार नाहीत, असा इशारा देत आगामी निवडणुकांमध्ये या अपमानाचे उत्तर कोल्हापूरकर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागलचे नूतन आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘लोकमत’च्यावतीने संपादक वसंत भोसले यांनी मुश्रीफ यांचे स्वागत केले. यावेळी कुरुकलीचे माजी सरपंच विकास पाटील, गोरंबेचे माजी सरपंच शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी ‘आमचं काय चुकलं’ अशी कोल्हापूरकरांना विचारणा केली. एवढेच नव्हे, तर कोल्हापूरकरांना अपमानास्पद वागणूक दिली, त्याबद्दल कोणीतरी बोलणे गरजेचे होते. कोल्हापूरकरांचा केलेला अपमान व एक लाख साड्या वाटप या दोन गोष्टी पाटील यांच्या मागे आयुष्यभर लागणार आहेत. त्यांना लोकांची नस माहीत नाही, लोकशाहीमध्ये आंदोलन, मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे, ते त्यांना आवडत नाही.
- ‘भाजप’ने कुपेकर घराण्याला शेवटपर्यंत झुलवत ठेवल्याने त्यांची तळ्यात-मळ्यात भूमिका राहिली. संध्यादेवी कुपेकर किंवा नंदिनी बाभूळकर यापैकी कोणीही उभे राहावे, अशी आमची इच्छा होती. आम्ही शेवटपर्यंत त्यांची वाट पाहिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.