कोल्हापूर : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वीप अंतर्गत झालेल्या “चला धावूया-सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करुया बळकट लोकशाहीसाठी” हे ब्रीद वाक्य असलेल्या या मतदार जनजागृतीसाठी काढलेल्या "रन फॉर वोट" लोकशाही दौडमध्ये ६ हजार ३५९ नागरिक सहभागी झाले. या विक्रमी दौडची नोंद आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्डमधे झाली.
पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित दौडमध्ये जिल्ह्यातील मतदार विद्यार्थी, युवती, नागरिक यांच्यासह शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. विशेष म्हणजे दिव्यांग, जेष्ठ धावपटूंही सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्डशी संबंधित संस्थेकडून नोंदीचे सन्मानपत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
दौडच्या आयोजनात स्वीपचे नोडल अधिकारी नीलकंठ करे, सहायक नोडल वर्षा परिट यांचा सहभाग होता. सकाळी ६.३० वाजता १० कि.मी., ६.४० वाजता ५ कि.मी. आणि ६.५० वाजता ३ कि.मी. ची दौड सुरु झाली. शेवटी दिव्यांगांच्या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. ‘मी मतदान करणारच’ अशा संदेशांचा टीशर्ट धावपटूंनी परिधान केला होता. प्रारंभी मतदान करण्याची शपथ सर्वांनी घेतली.
जिल्हाधिकारी १० किमीमध्ये सहभागी
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व धावपटूंना हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात केली. यानंतर स्वत:ही दौडमधे भाग घेतला. त्यांनी तब्बल १० किमीची धाव पूर्ण करीत आदर्श निर्माण करुन दिला.