कोल्हापूर : उद्या उगवणारा सूर्य पुन्हा नव्या आशा-आकांक्षा, संकल्पांचा.. गतवर्षी याच दिवशी ज्या वर्षाचे स्वागत केले, त्याचा आता निरोप समारंभ. या वर्षाने आम्हाला काय दिले.. सुखद क्षणांनी ओंजळ भरली, दु:खद घटनांना सामोरे जाण्याचे धैर्य दिले अशा या सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार १ जानेवारी म्हणजे नववर्षाचा पहिला दिवस. मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला प्रारंभ होतो. या पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीच्या या दोन्ही दिवसांचे सेलिब्रेशन आपल्या देशात केले जाते. मध्यरात्री १२ वाजता सरत्या वर्षाला निरोप आणि १ जानेवारीला नव्या वर्षाचे स्वागत करण्याची पद्धत आता जनमाणसात चांगलीच रूढ झाली आहे. सुरुवातीला काही सो कॉल्ड वर्गाचे फॅड म्हणत म्हणत प्रत्येकाच्या घरोघरी या दिवसाचे सेलिब्रेशन सुरू झाले आणि उत्सवप्रिय नागरिकांना आणखी एक दिवस मिळाला. हॉटेल्सची निवड करण्यापासून ते खाद्यपदार्थांच्या आॅर्डर, रंकाळा, पंचगंगेच्या काठावर बसून मध्यरात्रीचे सेलिब्रेशन, तरुणाईच्या जिभेचे चोचले पुरवणारे मॅकडी..केएफसी, घराच्या गच्चीवर कुटुंबीयांसोबत भोजनाचा आस्वाद.. असे विविध प्रकारचे प्लॅनिंग सध्या सर्वत्र सुरू आहे. घरातील महिलांनाही एक दिवस स्वयंपाकाला सुटी या मानसिकतेतून हॉटेल्समध्ये जेवायला जाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून हॉटेल व्यावसायिकही ग्राहकांना लज्जतदार जेवणाचा आस्वाद देण्यासाठी सज्ज झाले आहेत. खास या दिवसासाठी काही स्पेशल डिशेस बनवण्यात आले आहेत. या दिवशी मध्यरात्री १२ या वेळेला अधिक महत्त्व असल्याने बहुतांश हॉटेल्समध्ये उशिरापर्यंत जेवणाची सोय ठेवण्यात आली आहे. सोमवार, गुरुवार किंवा शनिवार असे उपवासाचे दिवस आले की मांसाहार करण्यावर बंधने येतात. यंदा मात्र बुधवारी थर्टी फर्स्ट आल्याने खवय्ये मांसाहार करू शकतील. याशिवाय शहराबाहेर असलेला मॅकडी किंवा केएफसी, डॉमीनोझ, अशा ब्रँडेड फास्टफूड रेस्टॉरंटसह शहरातील रंकाळा, पंचगंगाकाठी, बाग-बगिचे याठिकाणीही थर्टी फर्स्टची धम्माल उडणार आहे. आधी आपले सहकारी-मित्र-मैत्रिणींसोबत आणि मध्यरात्री कुटुंबीयांसोबत हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे घरोघरी उद्या कोणता मेनू बनवायचा, या विचारात गृहिणी लागल्या आहेत. ३१ डिसेंबरला चमचमीत, स्पाईसी जेवण आणि १ जानेवारीची सुरुवात मात्र गोडधोड पदार्थांनी अशी एक पद्धत आहे. उद्याचा दिवस आठवणीत राहावा, यासाठी खास नियोजन केले जात आहे. (प्रतिनिधी)सामाजिक कार्याची जोड या नवीन वर्षाला काही संस्थांनी सामाजिक कार्याची जोडही दिली आहे. साथी एस. एम. जोशी युवा मंचच्यावतीने बालकल्याण संकुलमध्ये उद्या, बुधवारी रात्री ३ हजार पणत्या प्रज्वलित करण्यात येणार आहे. रात्री ९ ते १२ या वेळेत गायक कोणार्क शर्मा यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम, एकपात्री, कलानृत्य असे विविध कार्यक्रम होतील. कार्यक्रमाला येणाऱ्या व्यक्तींना व्यसनमुक्तीची शपथ दिली जाणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज
By admin | Published: December 31, 2014 12:26 AM