कोल्हापूर : राज्याचे पर्यटनमंत्रीआदित्य ठाकरे यांनी रात्री अकरा वाजता केलेल्या रंकाळा पाहणीची सोमवारी दिवसभर जिल्हाभर चर्चा सुरू होती. ‘मंत्रिमहाेदयांना रात्रीचा रंकाळा कसा वाटला’ असा उपरोधिक प्रश्नही समाजमाध्यमावर उपस्थित केला जात आहे. अंधारात पाहणी करण्यापेक्षा त्यांनी ती केलीच नसती तरी चालले असते, अशीही प्रतिक्रिया व्यक्त झाली.शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत उत्सुकता होतीच. अशातच ते रविवारी सायंकाळी दत्तनगरीत नृसिंवाडीत जाऊन दर्शन घेऊन आले. त्यांनी तेथे कृष्णामाईचेही दर्शन घेतले. कोल्हापुरात येतानाही ते पंचगंगा नदी ओलांडून आले. आता दोन नद्यांचे संध्याकाळाच्या वेळी दर्शन घेतल्यानंतर कोल्हापुरात सध्या गाजत असलेल्या रंकाळ्याचे दर्शन नाही घेतले तर ते योग्य होणार नाही म्हणून त्यांनी कदाचित रात्री उशीर झाला तरी झोपण्याआधी रंकाळा पाहून घेतला.रंकाळ्याचे म्हणून काही प्रश्न आहेत परंतु त्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्यापेक्षा प्रत्येक नेता रंकाळ्याचे सुशोभीकरण करण्याच्या नादात असून त्यावर समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री ठाकरे यांनी भल्या सकाळी जर रंकाळ्याचे विलोभनीय दर्शन घेतले असते तर निश्चितच हे ठिकाण सुशोभित करण्याच्या नादात त्याचे अस्सलपण घालवू नका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या असत्या आणि त्यामुळे निधीही सत्कारणी लागला असता, अशा भावना व्यक्त होत आहेत.‘रंकाळा संवर्धन, सुंदर रंकाळा’ अशा गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडतो, नेत्यांचे फलक लागतात, अनेकांचे त्यातून पोटही भरते आणि रंकाळा मात्र आहे तिथेच आहे. तो चांगला राहावा यासाठी मूळचा कोल्हापूरकर जास्त जागरूक असल्यानेच तो जिवंत राहिला आहे. तो पर्यावरणीय व पर्यटनदृष्ट्या कसा समृद्ध करता येऊ शकतो यादृष्टीने काही विचार व्हायला हवा होता परंतु तसे काही घडले नाही..
अंधारात रंकाळ्याचे पाणी कसं दिसलं रं भाऊ..., कोल्हापूरकरांचा पर्यटनमंत्र्यांना उपरोधिक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:22 PM