कोल्हापूर : जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून गुरुवारी पहाटे धुक्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतला. पहाटे साडे सहा ते सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके पडले होते. सकाळी धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे.वर्षभर वातावरणातील लहरीपणाचा अनुभव जिल्ह्यातील नागरिक घेत आहेत. अचानक होणारा वातावरणातील बदल लोकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम करू लागला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३७ अंशाच्या घरात राहिले आहे. किमान तापमानातही वाढ होताना दिसते.
अशातच गुरुवारी पहाटे दाट धुके पडले होते. धुक्यांनी शहराला तासभर कवेत घेतले होते. सकाळी साडे सात, आठनंतर धुके कमी झाले. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच ते सहा दिवसात तापमानात वाढच होणार आहे.
जिल्ह्यातील तापमान ३८ अंशावर जाण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.