कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसऱ्याचा मुहूर्त कोल्हापूरकरांनी खरेदी करून साधला. सोने, कपडे, वाहन, मोबाईल, गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने मंगळवारी (दि. ११) फुलून गेली. त्यामुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.यावर्षी खंडेनवमी आणि दसरा वेगवेगळ्या दिवशी आल्याने कोल्हापूरकरांना खरेदीसाठी अधिक वेळ देता आला. विजयादशमीदिवशी बहुतांशजणांनी सकाळी पूजाअर्चा आणि घरातील धार्मिक विधी आटोपले. यानंतर ते खरेदीसाठी बाहेर पडले. सकाळपासून गुजरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, दुचाकी-चारचाकी वाहने आणि फर्निचरच्या शोरूम्स, आदी ठिकाणी गर्दी झाली. बहुतांशजणांनी मुहूर्तावर वस्तू, वाहन घरी नेण्यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी त्यांची नोंदणी केली होती. काहीजणांनी मात्र मुहूर्तावरच खरेदी करण्याला प्राधान्य दिले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या किमती घसरल्याने गेल्या तीन महिन्यांनंतर मागील आठवड्यापासून सोने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी गुजरी परिसरात दिवसभर गर्दी होती. काहींनी ग्रॅममध्ये, तर काहींनी पारंपरिक दागिन्यांची खरेदी केली. दसरा आणि दिवाळी एकाच महिन्यामध्ये आली असल्याने अनेक व्यावसायिकांनी विविध स्वरूपांतील सवलत योजना नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशीपासून जाहीर केल्या आहेत. या सवलतीचा लाभ घेत खरेदीसाठी ग्राहकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधला. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहवर्धक वातावरण दिसून आले. (प्रतिनिधी)सोने खरेदीचा उत्साहतीन महिन्यांनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्यासाठी ३० हजार २०० रुपयांपर्यंत दर आला आहे. ऐन दसरा-दिवाळी सणांच्या तोंडावर दर घसरल्यामुळे ग्राहकांना सोनेखरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली. तिचा ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करून लाभ घेतल्याचे कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, अर्ध्या गॅ्रमपासून ते तोळ्यापर्यंतची नाणी, कानातील, लाईटवेट नेकलेस, साखळी, आदी खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. अंबाबाईची रथातील पूजा आठ दिवस महिषासुराशी घनघोर युद्ध करून विजय मिळविलेल्या दुर्गेच्या विजयोत्सवाचा परर्माेच्च क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली. आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवी रथात बसून जाते, असा या मागचा अन्वयार्थ आहे. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीचीदेखील रथातील पूजा बांधण्यात आली.मराठा क्रांती मोर्चासाठी आवाहन या दसरा सोहळ््याचे औचित्य साधून नागरिकांनी व विविध संस्था, संघटनांनी कोल्हापूरकरांना शनिवारी होणाऱ्या मराठी क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमस्थळी ‘एक मराठा, लाख मराठा, सकल मराठा’ अशा आशयाचे स्टिकर्स वाटले जात होते. काही ठिकाणी टी शर्टस्ची विक्री करण्यात आली.
कोल्हापूरकरांनी साधला खरेदीचा मुहूर्त
By admin | Published: October 13, 2016 1:29 AM