कोल्हापूर: लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी कोल्हापूरकर पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत. आज, बुधवारी ४ वाजता इरिगेशन फेडरेशनच्या कार्यालयात होणाऱ्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. या महिनाअखेरपर्यंचा सरकारला अल्टिमेटम देतानाच १ मार्चपासून आमरण उपोषण सुरू करण्याच्या निर्णयाची घोषणाही होणार आहे.
राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी यासंदर्भात माहिती देताना वीज बिल माफी देतो असा ‘शब्द’ देऊन तो न पाळणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी, आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक आंदाेलनाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. लॉकडाऊन काळातील वीज बिले माफी करावीत यासाठी एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली इरिगेशन फेडरेशनने मुख्यमंत्र्यांपासून ते ऊर्जामंत्र्यांपर्यंत सर्वांची भेट घेऊन वीज बिल माफीची मागणी केली होती. स्वत: शरद पवार यांनादेखील याबाबत सांगण्यात आले होते. या सर्वांनी लॉकडाऊन काळातील चार महिन्यांतील बिले माफ करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. माफी मिळणार म्हणून जनताही शांत असतानाच पुन्हा एकदा ‘महावितरण’कडून वसुलीचा धडाका सुरू करण्यात आला आहे. बिल न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शनही तोडले जात आहे. यावरून जनतेमध्ये संतापाची लाट आली आहे.
या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांपूर्वी थंड झालेले वीज बिल भरणार नाही, आंदोलन आता पुन्हा एकदा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीच आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले असून यात आंंदोलनाचे स्वरूप निश्चित होणार आहे.
चौकट ०१
गावागावांत पथक
वीज तोडायला येणाऱ्या वायरमनना रोखण्यासाठी प्रत्येक गावात २० ते २५ जणांचे पथक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.