सचिन भोसले : कोल्हापूर : कोल्हापूरकर खवय्ये म्हणून जगप्रसिद्ध आहेत. तांबडा, पांढरा जसा प्रसिद्ध आहे, तसेच कांदेपोहे हाही येथील खवय्यांचा अविभाज्य भाग बनला आहे. लॉकडाऊनमुळे तर दिवसातून एकदा होणारे कांदेपोहे आता दोन वेळेला घरात होऊ लागल्याने दिवसाकाठी जिल्ह्यात ३० टन पोहे फस्त होऊ लागले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन कमी, अनियमित वाहतुकीमुळे दर प्रतिकिलो आठ रुपयांनी महागला आहे.
कांदापोहे हा नाश्ता म्हणून अधिक प्रमाणात केला जातो. विशेषत: घराघरांमध्ये सकाळी हाच नाश्ता घरातील सदस्यांना दिला जातो. याकरिता कांदापोहे (भडस), भडस (जवारी), नवसारी, अशा जातीच्या पोह्याला मागणी आहे. दडपे पोहे करण्याकरिता पातळ पोहा यालाही मागणी अधिक आहे. लॉकडाऊनच्या काळात या सर्व प्रकारच्या पोह्यांची मागणीत वाढ झाली आहे. यापूर्वी १५ टन अर्थात दीड ट्रक इतकी मागणी दिवसाकाठी होती. तीच आता ३० टन इतकी झाली आहे. कोल्हापूरला उज्जैन (मध्य प्रदेश), भाटपारा येथून पोहा आवक होतो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा जिल्हा रेडझोनमध्ये गेल्याने उत्पादन व पुरवठाही पुरवठा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. रोहा (जि.रायगड) मधूनही कांही प्रमाणात आवक होते परंतू ती देखील कमी आहे. भरणी आणि उतरणीसोबत वाहतुकीचे दरही वाढले आहेत. पूर्वी सरासरी ४६ रुपये मिळणारा पोहा आता ५० रुपये किलोवर गेला आहे.भेलपार्टीत वाढलॉकडाऊनमुळे घरातील अबालवृद्ध घरातच असल्याने रोज भेळ पार्टीचा बेत होऊ लागला आहे. त्याकरिता चिरमुरे, शेंगदाणा, फुटाणे, आदींची मागणी वाढली आहे. दिवसाकाठी १२ टन चिरमुरा खपत आहे. स्थानिक उत्पादकांसह मलबार येथूनही हा चिरमुरा येत आहे. स्थानिकामध्येही लांब असेल तर ८० रुपये प्रतिकिलो, तर बुटका जवारी असेल तर १२० रुपये इतका प्रति किलो दर आहे.
कोरोनाचा परिणाम म्हणून कोल्हापूर बाजारात पोह्याचे उत्पादन व आवकही कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून दरवाढ झाली आहे. घरोघरी नियमित खाल्ला जाणारा नाष्टा म्हणून लोक पोहे आवडीने खातात. त्यामुळे मागणीत वाढ झाली आहे.- मन्सूर मुल्लाणी , पोहे, चिरमुरे घाऊक विक्रेते,