कोल्हापूर : कोल्हापूरकर जनतेचे प्रेम आणि विश्वासासह महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पगारी पुजारी, झिरो पेंडंसी, रेशन डिजिटलायझेशन, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना मनमोकळे केले.कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक दौलत देसाई यांची शुक्रवारी(दि.८) यांची बदली झाली. परंतु अद्याप जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना बदलीची पदस्थापना मिळालेली नाही. चार दिवसात ती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधताना कोल्हापूरातील कारकिर्दीचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, कोल्हापूरकरांनी आपल्यावर खूप प्रेम केले. त्यांच्या पाठबळामुळे व शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावू शकलो. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी, तहसिलदार कार्यालयांमधील अधिकाऱ्यांना कामाचे स्वातंत्र्य देऊन विश्वास दाखविला. त्यामुळे त्यांच्याकडून उत्साहाने व चांगले काम झाले. त्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले. कुटूंबप्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावर भर देऊन गेल्या दोन वर्षात काम केले. लोकांना आठवणीत राहील अशीच कामाची पध्दत राहीली.ते पुढे म्हणाले, येथील कारकिर्दीत कोल्हापूरकरांच्या प्रेम आणि विश्वासामुळे अनेक प्रश्न मार्गी लावता आले. या कालावधित कोणताही प्रश्न चिघळू न देता संवादाने तो सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पुजारी, झिरो पेंडंसी, आॅनलाईन सातबाराचे काम, रेशन डिजिटलायझेशनमध्ये राज्यात अव्वलस्थान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी बाधित होणाऱ्या लोकांच्या शंकांचे निरसन करून योग्य मोबदल्यात त्यांना भूसंपादनासाठी तयार करण्याचे काम, माजी सैनिकांच्या विधवांना जमिनीचे वाटप, आणिबाणीतील सत्याग्रहींना पेन्शन मंजूर, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला.
मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी जमिनी दिल्या असे विविध प्रश्न मार्गी लावल्याचे मनस्वी समाधान आहे. जिल्हा नियोजन समितीमधील निधी जिल्ह्यातील विविध विकासकामांवर शंभर टक्के खर्च होईल या दृष्टीनेही प्रयत्न राहीला.