कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासन गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाच्या विरोधात लढत आहे. अत्यावश्यक साधने खरेदी करण्यास निधी नसतानाही ही लढाई सुरू आहे. गुरुवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मदतीचे आवाहन करताच महापालिकेकडे मदतीचा ओघ सुरू झाला. शुक्रवारी दोन दानशूरांनी महापालिकेला मदत केली.
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी गाद्या, उशा, बेडशीट, पिलो कव्हर व चादर असा १० गाद्यांचा सेट पद्मा गादी कारखान्याचे मालक प्रकाश नारायण पाटील (मळगेकर) यांनी दिला. साहित्य महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे प्रकाश पाटील यांनी दिले. प्रशासक बलकवडे यांनी कोल्हापुरातील उद्योगपती, सामाजिक संस्था व नागरिकांस महापालिकेस वस्तू स्वरूपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन पद्मा गादी कारखाना यांनी १० गाद्यांचा सेट दिला.
निल बावडेकर यांच्यावतीने सव्वा लाखाची मदत-
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी श्रीपंत अमात्य बालविकास ट्रस्ट, श्रीमंत माईसाहेब बावडेकर स्कूलचे व्हाईस प्रेसिडेंट निल पंडित-बावडेकर यांनी सव्वा लाखाची औषधे दिली. प्रशासक बलकवडे यांनी त्याचा स्वीकार केला. पंडित-बावडेकर यांनी ऑक्सिजन मास्क ३००, नसल कॅन्यूला ३००, लेटेक्स एक्झाम ग्लोज २० बॉक्स, व्हिटॅमिन सी टॅबलेट ८०००, मल्टी व्हिटॅमिन टॅबलेट ८००० आदी औषधे दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, निखील मोरे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २३०४२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - काेल्हापूर महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी पद्मा गादी कारखान्याच्या वतीने दहा गाद्यांचा सेट भेट देण्यात आला.
फोटो क्रमांक - २३०४२०२१-कोल-केएमसी०२
ओळ -काेल्हापूर महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी निल पंडित बावडेकर यांच्यावतीने सव्वा लाखाची औषधे देण्यात आली.