कोल्हापूर :नॉनथाबुरी (थायलंड) मध्ये झालेल्या १४ वर्षाखालील आयटीएफ आशिया टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने दुहेरीत विजेतेपद, तर एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. १४ वर्षाखालील आयटीएफ अशिया १४ वर्षाखालील विकास अजिंक्यपद स्पर्धेत तिने दुहेरीत भारताच्याच आकृती सोनकुसरे हिच्या साथीने साबा-यासमाना (इराण) या जोडीचा पहिल्या फेरीत ६-४, ६-१ असा पराभव केला. तर उपांत्यपूर्व फेरीत या दोघींनी एच.चॅन- कॅरॉन येऊंग (हॉंगकॉंग) या जोडीवर ६-२, ६-३ अशी मात केली. उपांत्य लढतीत या जोडीने तारीता-एन.सकुलवोगनटना (थायलंड) या जोडीवर ६-१, ६-२ अशी मात केली. अंतिम फेरीत या जोडीने मिश्का गोएनाडी-अंजली जुनार्तो (इंडोनेशिया) या जोडीवर ६-३, ६-३ अशी मात करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
एकेरी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ऐश्वर्याला पराभव स्विकारावा लागला. पहील्या फेरीत तिला पुढे चाल मिळाली. तर दुसऱ्या फेरीत तिने श्रीलंकाच्या जी लॅमपुलेज डॉनचा ६-४, ६-२ असा पराभव केला. तर उपांत्यपूर्व फेरीत तिला कझाकिस्तानच्या अल्बिना काकेनोव्हाने ऐश्वर्यावर ४-६,२-६ अशी हार पत्करावी लागली. तिला अर्शद देसाई टेनिस ॲकडमीचे अर्शद देसाई, मनाल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. आयटीएफ १४ वर्षाखालील आशिया टेनिस विकास कार्यक्रमाअंतर्गत थायलंडमध्ये झालेल्या दुहेरी स्पर्धेत कोल्हापूर ऐश्वर्या जाधव हिने भारताच्याच आकृती सोनकुसरे हिच्या साथीने विजेतेपद पटकाविले.