कोल्हापूर : राज्याच्या तुलनेत कोल्हापुरात कोरोना संसर्ग एक महिना उशीरा सुरू झाल्याने तो कमी व्हायला देखील वेळ लागत आहे,पण वाटते तितकी परिस्थिती गंभीर नाही. उलट लसीकरण चांगले झाल्याने गेल्या चार आठवड्यात बाधीत होण्याचे प्रमाण कमी होत १० टक्क्याच्या आत आले आहे.
प्रशासन उत्तम पद्धतीने काम करत असून काही दिवसातच येथील संसर्ग नियंत्रणात येईल असा निर्वाळा केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांनी गुरुवारी दिला. असे असेल तर कोल्हापुरचा समावेश स्तर ४ मध्ये का, इतकी बंधने का असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी हे पथक कोल्हापुरात आले होते, जिल्हाधिकारी कार्यालयात तीन तास चाललेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्याची कोरोना स्थिती गंभीर नसल्याचे सांगितले. असे असेल तर आधी टास्क फोर्स, नंतर आरोग्य समिती यांचे दौेरे का होत आहे हा प्रश्न आहे.डॉ. आवटे म्हणाले, जिल्ह्यात ६० वर्षावरील नागरिकांचे ७८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून रुग्णांची शोध मोहिम, ६ मिनिटे चालण्याचा संजीवनी अभियान, महाआयुष अंतर्गत वृद्धांचे सर्वेक्षण, बेडचे व्यवस्थापन, रुग्णांना वेळेत उपचार असे चांगले नियोजन केले गेले आहे. ते अधिक प्रभावी कसे होईल यावर लक्ष दिले पाहीजे.