कोल्हापूर : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत यजमान भारताच्या नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यात शनिवारी कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंत, स्वप्नील कुसाळे यांनी मिश्र ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची, तर अभिज्ञा पाटील हिने २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली, तर दोन दिवसांपूर्वी राही सरनोबत हिने वैयक्तिक प्रकारात एक रौप्य व सांघिक एक सुवर्णपदकाची कमाई केली.
गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत आयएसएसएफतर्फे भरविण्यात आलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यात कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने दोन दिवसांपूर्वी २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक मनू भाकर, चिंकी यादव यांच्या साथीने एक सुवर्ण, तर वैयक्तिक याच प्रकारात अटीतटीच्या लढतीत रौप्य, अशी दोन पदके मिळविली. शनिवारी (२७) कोल्हापूरचा युवा नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळे याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकाविण्याची कामगिरी केली. त्याने ही कामगिरी निरजकुमार व चनासिंग यांच्या साथीने केली. या कामगिरीबरोबर गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत हिने ५० मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात संजीव रजपूत हिच्या साथीने सुवर्णपदक पटकाविले. या सर्वांसोबत नवोदित अभिज्ञा अशोक पाटील हिने गुरप्रीत सिंगच्या साथीने रौप्यपदकाची कमाई केली. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. या स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य ही कोल्हापूरकर नेमबाजांनी पटकाविली आहेत. यापूर्वी विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत विक्रमी कामगिरी तेजस्विनी व राही यांनी केली होती. यंदा पदके मिळविण्यात आणखी दोघांचा समावेश या यादीत झाला. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरचा डंका भारतात नव्हे, तर जगात झाला आहे.