कोल्हापूर : भारताचा फुटबाॅलस्टार व कोल्हापूरचा अनिकेत जाधव हा ओडिशा एफसीकडून दोन कोटी १० लाख रुपयांच्या करारावर करारबद्ध झाला आहे. आता तो या संघाचे आयएसएल स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी तो इस्ट बेंगालकडून खेळत होता. इतक्या मोठ्या रकमेवर करारबद्ध होणारा तो पुन्हा एकदा एकमेव महाराष्ट्रीय फुटबाॅलपटू ठरला आहे.अनिकेत हा करार करण्यापूर्वी इस्ट बेंगाल संघाचे प्रतिनिधित्व करीत होता. त्याचा दिवसेंदिवस बहरत जाणारा खेळ पाहून ओडिशा एफसी संघाने त्याला दोन कोटी १० लाखांच्या करारावर करारबद्ध केले. त्याकरिता इस्ट बेंगाल संघाशी झालेला करार संपुष्टात आणण्यासाठी या संघाने ४५ लाखांची भरपाई त्याच्यासाठी केली आहे.
तत्पूर्वी त्याने २०१७ साली भारतात झालेल्या सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत भारतीय फुटबाॅल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर भारतीय फुटबाॅल महासंघाच्या ॲरोजचे (२०१७-१८), तर जमशेदपूर एफसी (२०१९-२०), हैदराबाद एफसी (२०२१-२२), इस्ट बेंगाल (२०२२-२३) या संघांचे कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यात त्याने प्रतिनिधित्व केले आहे.
आगामी हिरो आयएसएल चषक स्पर्धेत ओडिशा एफसीची जर्शी घालणे हा माझ्याकरिता मोठा सन्मान आहे. मला या अभूतपूर्व क्लबचे आणि ओडिशाच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. - अनिकेत जाधव, भारतीय फुटबाॅल स्टार