कोल्हापूर : जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडे पालकमंत्रिपद दिले जाते, हा आतापर्यंतचा प्रघात आहे. त्यानुसार कोल्हापूरचा पालकमंत्री कॉँग्रेसचा होऊ शकतो, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रिपदाबाबत कॉँग्रेसचे श्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.‘सतेज कृषी’ प्रदर्शनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना मंत्री व पालकमंत्री पदाबाबत विचारणा केली असता, ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, कर्जमाफीबाबत चांगला निर्णय होणार असून मागील सरकारने केलेली कर्जमाफी व उर्वरित शेतकरी यांची माहिती घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
आतापर्यंतच्या कर्जमाफीत कोणता घटक राहिला आहे. कर्जमाफीबरोबरच शेतीमाला हमीभाव मिळाला पाहिजे, यावर कॉँग्रेसचा ‘फोकस’ आहे. मंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, अद्याप खातेवाटप झालेले नाही. मंत्रिपदाबाबतचा निर्णय कॉँग्रेसश्रेष्ठी घेतील.कोल्हापूरच्या उद्योगांना बळ देणार- ऋतुराज पाटीलकोल्हापुरातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, ते येथेच कसे राहतील आणि मोठे नवीन उद्योग कसे येतील, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. याबाबत कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सशी चर्चाही झाली आहे. उद्योगांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांना पत्र देणार असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.