कोल्हापूर : अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या बारा वर्षाखालील ऑल इंडिया रॅकींग स्पर्धेत कोल्हापूरच्या हर्षा देशपांडे हिने वैयक्तिक गटात, तर दुहेरीत मुंबईच्या व्रितिका शाहच्या साथीने उपविजेतेपदाला गवसणी घातली.
एकेरीत हर्षाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. तर दुसऱ्या फेरीत तिने एंजल परमार (गुजरात) हिचा ६-१, ६-० असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीत हर्षाने अनाया सेन (उत्तर प्रदेश) हिचा ६-३, ६-३ असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत हर्षाने मुंबईच्या व्रितीका शाहचा ६-७(२), ६-३, ७-५ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत हर्षाला गुजरातच्या मारिया पटेल हिच्याकडून १-६, ०-६ असा पराभव पत्करावा लागला.
दुहेरीत हर्षाने मुंबईच्या व्रितीका शाहचा साथीने पहिल्या फेरीत गुजरातच्या प्रगती ठाकर-किओशा दिक्षित या जोडीचा ६-०, ६-१ असा पराभव केला. उपांत्य लढतीत हर्षा-व्रिविका या जोडीने देविका पिंगे(महाराष्ट्र) व जनिषा बियाणी(गुजरात) या जोडीचा ६-०, ६-० असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत मात्र, या जोडीला मारिया पटेल व यान्या मेहता या गुजरातच्या जोडीकडून २-६, २-६ असे पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हर्षा ही कोल्हापूर जिल्हा लाॅन टेनिस असोसिएशनचे खेळाडू असून तिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मनाल देसाई, अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.