संदीप आडनाईककोल्हापूर : ज्या ‘शो’ची सारेजण उत्सुकतेने वाट पाहत होते, त्या डिस्कव्हरी चॅनेलवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड शो’मध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘आवाज’ कोल्हापूरचा युवक ‘मोहक’ निनाद काळे बनला आहे. या शोसाठी त्याने मोदींसाठी डबिंग केले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा कोल्हापूरच्या युवकाला मोठी संधी मिळाली असून, हा ‘मोहक आवाज’ जगभर निनादला आहे.डिस्कव्हरी चॅनेलवर सोमवारी रात्री नऊ वाजता प्रसिद्ध ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ हा लोकप्रिय शो प्रसारित करण्यात आला. बेअर ग्रिल्स याचा हा शो एकूण पाच भाषा आणि १८० देशांमध्ये प्रसारित करण्यात आला. एका तासाच्या या ‘शो’चे चित्रीकरण उत्तराखंड येथील ‘जिम कॉर्बेट पार्क’मध्ये गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये करण्यात आले होते.गेल्या आठवड्यात डिस्कव्हरीच्या मुंबईतील स्टुडिओमध्ये मोहकने डबिंग केले. तीन तासांहून अधिक वेळ सलग डबिंग करण्यात आले. डझनहून अधिक कलाकारांमधून महिनाभराच्या शोधानंतर मोदी यांच्या आवाजासाठी मोहकची निवड करण्यात आली. मोदींच्या आवाजाला साजेसे सादरीकरण आणि खणखणीत आवाज या जोरावर मोहकला ही संधी मिळाली.२८ वर्षांचा मोहक हा मूळचा कोल्हापूरचा युवक असून, दहावीची परीक्षा दिल्यानंतर त्याने १७ वर्षांचा असल्यापासून डबिंग आर्टिस्ट म्हणून मुंबईत काम सुरू केले. त्याने आतापर्यंत अनेक इंग्लिश, हिंदी, मराठी कार्यक्रमांसाठी आवाज दिला असून, प्रामुख्याने हॉलिवूडचे सिनेमे, टीव्हीवरील मालिका, जाहिराती, अॅनिमेशन, कार्टून मालिकेतील विविध पात्रांसाठी आवाज दिला आहे. यामध्ये डिस्ने, डिस्कव्हरीच्या मालिका, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम यासारख्या वेबटीव्हीसाठीही आवाज दिला आहे. त्याचे वडील निनाद काळे हेही गेली ३0 वर्षे डबिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
देशाच्या पंतप्रधानांसाठी आवाज द्यायला मिळणे, हे भाग्य आहे. ही संधी एकदाच मिळते. माझ्यासाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. जगाच्या दृष्टीने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला आवाज देताना अनेक निकष पाहिले गेले. हे सोपे नव्हते. मोदींचे वय, त्यांचा आवाजाला साजेशे हावभाव यावर काटेकोरपणे पाहिले गेले.- मोहक निनाद काळे,डबिंग आर्टिस्ट.