कोल्हापूर : लाचखोरांना गजाआड टाकण्यासाठी गेल्या वर्षभरात, तसेच चालू वर्षातही पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्याची ‘क्वालिटी’ कामगिरी झाली आहे. प्रथमवर्ग दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते शिपाई, खासगी पंटरवरही कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी भयमुक्त राहून बिनदिख्खतपणे लाचखोराविरोधात पाऊल उचलावे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात मुद्रांक जिल्हाधिकारी, सह जिल्हा निबंधक कार्यालयातील सहायक नगररचनाकार (वर्ग २) गणेश माने याला २० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. राज्यातील सर्वांत मोठी कारवाई असल्याने त्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक नाडगौडा कोल्हापुरात आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, वर्षभरात तसेच चालू वर्षात संपूर्ण विभागात कोल्हापूरने ‘क्वालिटी’ कामगिरी केली. गेल्या महिन्याभरात कोल्हापूर विभागाने लाचेच्या तीन कारवाई करून लाचखोरांना गजआड केले. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत व त्यांच्या टीमचे काम कौतुकास्पद आहे.
बिनधास्त तक्रारीसाठी पुढे या..
लाचेशिवाय तुमचे काम आडवणूक होत असेल तर त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यासाठी नागरिकांनी भय न बाळगता बिनदिख्खतपणे पुढे यावे, तक्रारदाराचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक नाडगौडा यांनी केले.
किमान चार महिने तरी कामकाज सुधारते...
लाचप्रकरणी कारवाईनंतर त्या कार्यालयात पुढील तीन महिने अधिकारी व कर्मचारी लाच न घेता झटपट कामे होतात. पण, चार-पाच महिन्यांनंतर पुन्हा लाच घेतल्याशिवाय कामे होत नाहीत हे तितकेच सत्य आहे. त्यामुळे अशा कार्यालयावर किमान चार महिन्यांतून एकदा तरी लाचखोरांना पकडावे, आरोपींना गजाआड करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
तक्रारदार होतो फितूर
लाचप्रकरणात आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण मोठे आहे. यावर ते म्हणाले, सरकारी पंच फितूर होत नाहीत; पण तक्रारदारच फितूर होण्याचे मोठे प्रमाण असल्याने अनेक लाचखोर निर्दोष सुटतात, ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो नं. ०६०२२०२१-कोल-सुहास नाडगोंडा