शिवाजी पाटील
सिद्धनेर्ली : केरळ येथे होणाऱ्या २५ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी महाराष्ट्राच्या संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व सिद्धनेर्लीच्या (ता. कागल) रणजित निकम याच्याकडे सोपविले आहे. नागपूर येथे संघ निवडीकरिता आयोजित करण्यात आलेल्या बापूंना चषक स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये निकम याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर २ सामन्यांत २१० धावा फटकावल्या. यामध्ये दुसऱ्या सामन्यात ११४ चेंडूंत ५ षटकार व १४ चौकारांच्या मदतीने केलेल्या १४२ धावांनी त्याच्या स्फोटक फलंदाजीची ओळख करून दिली.
रणजित याचे शालेय शिक्षण प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूल सिद्धनेर्ली या शाळेत झाले. क्रीडा शिक्षक भाऊसाहेब लाड यांनी त्याच्यातील गुणवत्ता ओळखून शाळेतच क्रिकेटचे धडे द्यायला सुरू केली. त्याची २०१३-१४ मध्ये १४ वर्षांखालील कोल्हापूर जिल्हा संघामध्ये निवड झाली. २०१४ मध्ये १४ वर्षांखालील जिल्हा संघाचा कर्णधार केले. २०१४-१५ मध्ये १६ वर्षांखालील व २०१५-१६ मध्ये १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली. यादरम्यान त्याने कोल्हापूर येथील रमेश कदम ॲकॅडमीमध्ये रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला.
२०१९-२० च्या हंगामात २३ वर्षांखालील महाराष्ट्र संघातून खेळताना त्याने गुजरात, कर्नाटक व मध्य प्रदेश संघाविरुद्ध सलग ३ सामन्यांत ३ शतके झळकावली होती. याच कामगिरीच्या जोरावर २०१९ मध्ये त्याची महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या सामन्यासाठी महाराष्ट्र संघात रणजी क्रिकेट ट्रॉफीसाठी निवड झाली.
रणजितची कामगिरी
२०१७-१८ पासून शिवाजी विद्यापीठ संघातून पश्चिम विभागात प्रतिनिधित्व करत असून २०१८-१९ पासून तो विद्यापीठ संघाचा कर्णधार आहे. सय्यद अली टी-२० स्पर्धेत त्याने २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. २०२०-२१ मध्ये विजय हजारे चषकमध्येही त्याने सहभाग नोंदवला आहे. गेल्या ८ वर्षांपासून राज्यस्तर, विद्यापीठस्तर पश्चिम विभाग व जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी.
कष्टातून यश
रणजितचे वडील गावातीलच माध्यमिक शाळेत लिपिक, तर आई गृहिणी आहे. रणजितने अतिशय कष्टातून मिळवलेले यश युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, तसेच त्याने आपला खेळ असाच उंचावत मोठे यश मिळवावे, असा विश्वास त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.