लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा सदैव प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे ‘ब्रँड कोल्हापूर’करांनी याची कायम मनात जाणीव ठेवून कोल्हापूरचा नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी भविष्यातील वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी केले. हॉटेल सयाजी येथे शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ब्रँड कोल्हापूर’ गौरव समारंभप्रसंगी ते बोलत होते.
गगराणी म्हणाले, स्वत:चे गाव, स्वत:चे अस्तित्व, स्वत:ची संस्कृती ही आपल्यासोबत अदृश्य स्वरूपात असते. माझ्या जडणघडणीत हे गाव नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो; त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना गावाचा तितकाच वाटा असतो. जगात कुठेही असाल तर कोल्हापूरचे नाव घेतले जाते. कोल्हापूरला दोन हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलेचा समृद्ध वारसा आहे. आरक्षणाची सुरुवात, चित्रपट निर्मिती, पहिला कॅमेरा आणि देशासाठी पाहिले ऑलिम्पिक पदक विजेते कोल्हापूरकर होते. त्यामुळे कोल्हापूर हे सुरुवातीपासूनच ब्रँड आहे. येथील साहित्य, कृषी आणि उद्योग क्षेत्र हे प्रेरणा देणारे आहे. ‘ब्रँड कोल्हापूर’ असलेल्या सर्वांना कोल्हापूर शहराने दिलेला वारसा याची जाणीव सतत मनात ठेवून ब्रँड कोल्हापूरकरांनी पुढील वाटचाल करावी.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, आपल्या कोल्हापूरची ओळख ही तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल एवढीच होती. मात्र, येथील रत्नांनी केलेल्या अलौकिक कामगिरीमुळे सर्वत्र नावलौकिक मिळाला आहे. ही रत्ने पुढे आली पाहिजेत. त्यांची जगभरात ओळख झाली पाहिजे. आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या जगात कोल्हापूरचे ब्रँडिंग आपणच केले पाहिजे. ‘मी कोल्हापूरचा’ हे सांगायला विसरू नका. यासाठी अग्रेसर असले पाहिजे. नागपूर, औरंगाबाद, पुणे ही तीन शहरे राज्यात विविध क्षेत्रांत अग्रेसर आहेत. खाद्यसंस्कृतीत इंदोर प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे कोल्हापूरही प्रसिद्ध झाले पाहिजे.
आयटी क्षेत्रासह आपण खाद्यसंस्कृतीमध्ये आणखी पुढे कसे जाऊ शकतो. भविष्यात कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांत अग्रेसर कसे राहू, याकडे पाहिले पाहिजे. कोल्हापूरची ओळख ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणे हा ब्रँड कोल्हापूरचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले. चेतन चव्हाण यांनी प्रास्ताविक, तर अनंत खासबारदार यांनी स्वागत केले. आमदार ऋतुराज पाटील यांनी आभार मानले.
या कोल्हापूरकरांचा गौरव
डाॅ. सी. डी. लोखंडे, डाॅ. पी. सी. पाटील (शास्त्रज्ञ), अनुराधा भोसले (सामाजिक कार्य), उषा जाधव (अभिनेत्री), किशोर पुरेकर (आंतरराष्ट्रीय शिल्पकार), सतीश सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, रोहित कांबळे, राजेंद्रकुमार मोरे (फिल्मफेअर), प्रेम आवळे (आंतरराष्ट्रीय ॲडव्हान्स पाेर्टृेट निवड), सागर नलवडे (आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक), अजिंक्य दीक्षित (ड्रोन मेकर), अमित माळकरी (आंतरराष्ट्रीय सँड आर्टिस्ट), अनुप्रिया गावडे (एशिया बुक रेकाॅर्ड), लेफ्टनंट सार्थक धवन, सलीम मुल्ला (साहित्यिक), मधुरा बाटे, ऊर्मी पाटील (भरतनाट्यम), वैष्णवी सुतार, अनिल पोवार, स्वप्निल पाटील (सर्व दिव्यांग गटांतून शिवछत्रपती), गिरिजा बोडेकर (बेसबाॅल, शिवछत्रपती), नंदिनी साळोखे (महान भारत केसरी किताब), उज्ज्वला चव्हाण, (दिव्यांग टेबलटेनिसपटू), सम्मेद शेटे (बुद्धिबळपटू), अभिज्ञा पाटील (नेमबाजी), आरती पाटील (मॅरेथाॅन), केदार साळुंखे (विश्व विक्रमवीर), विक्रम कुराडे (कुस्ती), अथर्व गोंधळी (तायक्वोंदो), डाॅ. पल्लवी मूग (ॲथलेटिक्स), स्वाती शिंदे (कुस्ती), कमलाकर कराळे (दिव्यांग आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ), जिनेंद्र सांगावे (रेसर), आदित्य करपे ( तायक्वोंदो), डाॅ. अतीश दाभोळकर ( आयसीटीपी संचालक), उत्तम फराकटे, यश चव्हाण, अविनाश सोनी, अमर धामणे, वरुण कदम, बलराज पाटील, मुकेश तोतला, बाबासाहेब पुजारी, अतुल पवार, कुमार ब्रिजवाणी, नितीन कुलकर्णी, साहील चौहान, सुप्रिया निंबाळकर, वीरेंद्रसिंह घाटगे, वैभव बेळगावकर (आयर्नमॅन) यांच्यासह ‘खेलो इंडिया’मध्ये चमकलेले खेळाडू अशा ९८ जणांचा गौरव करण्यात आला.
चौकट
केवळ कोल्हापुरातच शक्य
मला नेहमी अनेकजण विचारतात, तुम्ही गगराणी आणि मराठी इतकं चांगले कसं बोलता? यावर गेल्या २५ वर्षांत मी कोल्हापूरचा आहे. आमच्या इथे सगळ्या भाषा मराठीतून बोलल्या जातात; त्यामुळे समोरच्याला वेगळी ओळख सांगायची गरज लागत नाही. मास्कला ‘मॅस्क’ असे म्हणणारे येथेच भेटतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
(फोटो स्वतंत्र देत आहे)