लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीवर कोल्हापूरच्या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीतून ही यादी जाहीर करण्यात आली. चिटणीसपदी इचलकरंजीचे शशांक बावचकर, सूर्यकांत पाटील बुदिहाळकर यांची तर सरचिटणीसपदी ॲड. गुलाबराव घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शशांक बावचकर यांच्या घरामध्येच काँग्रेसची परंपरा असून त्यांचे वडील ३३ वर्षे इचलकरंजी शहराचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेली १० वर्षे बावचकर हे इचलकरंजीचे नगरसेवक म्हणून तसेच समाजवादी प्रबोधिनीचे खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. आमदार प्रकाश आवाडे हे काँग्रेसपासून बाजूला गेल्यानंतर आता बावचकर यांना बळ देण्यासाठी त्यांची ही निवड केल्याचे मानले जाते.
१९७८ पासून सूर्यकांत पाटील बुदिहाळकर हे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. एनएसयूआयच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले होते. युवक काँग्रेसच्या राज्याच्या विविध विभागांचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी काम केले. मात्र गेली काही वर्षे ते काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नव्हते. तरीही पक्षाने त्यांच्या आधीच्या कार्याची दखल घेऊन पुन्हा नव्याने त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले ॲड. गुलाबराव घोरपडे हे दहा वर्षे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक मंदिरांना समितीच्या माध्यमातून अर्थसाहाय्य केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ते जवळचे समजले जातात.