कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या लाभार्थ्यांना ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टमनच्या माध्यमातून बुधवारअखेर ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम’ (एईपीएस)द्वारे ७९१९ ग्राहकांना एक कोटी ४७ लाखांचे विनामूल्य घरपोच वितरण करण्यात आले आहे. कोल्हापूर डाक विभागाची ही कामगिरी राज्यात अव्वल असल्याची माहिती डाकघर प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
सध्या पोस्ट आॅफिसमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी शहरी भागामध्ये २३७ आणि ग्रामीण भागामध्ये ७३९ कर्मचारी कार्यरत आहेत. ते खातेदारांना पोस्ट आणि बॅँकेच्या सेवा देत आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण देण्यात आलेले आहे.
१०० कोटींपेक्षा जास्त रक्कम पोस्ट आॅफिसमध्ये जमा केली आहे व पोस्ट आॅफिसमार्फत २२ कोटींपेक्षा जास्त रक्कम खातेदारांना अदा केली आहे. लॉकडाऊन असताना इतर बँकांच्या लाभार्थ्यांबरोबरच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या २९२४ ग्राहकांना ५४ लाख ५१ हजार रुपयांचे वितरण आणि ४५६७ ग्राहकांकडून ९१ लाख १६ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. फंड ट्रान्स्फर, बिल पेमेंट, आदी सेवाही पुरविण्यात आल्याचे ईश्वर पाटील यांनी सांगितले.आधार लिंक नसल्याने अडचणआतापर्यंत बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, आदी बँकांनी सुमारे तीन लाख लाभार्थ्यांची माहिती पोस्टाकडे दिली आहे. संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाची रक्कम घरपोच पोहोचविण्याचे काम पोस्टाकडून सुरू आहे. त्यात बँक खात्याला आधार लिंक नसणे ही एक अडचण ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळात आजअखेर पोस्ट आॅफिस ३६२४९ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले. मात्र, त्यांपैकी २२,८२२ लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्याने त्यांना या सेवेचा लाभ घेता आला नाही. तरीदेखील सर्व ग्रामीण डाक सेवक अथवा पोस्टमन व इतर कर्मचाऱ्यांद्वारे लोकांपर्यंत पोहोचून हा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ईश्वर पाटील यांनी केले.