कोल्हापूर : जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने २५ ते ३१ जुलैदरम्यान रोम (इटली) येथे आयोजित केलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत वैभव नारायण पाटील (रा. बानगे, कोल्हापूर) याने १७ वर्षांखालील ५५ किलो वजनी गटामध्ये फ्री स्टाइल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.वैभव मूळचा कागल तालुक्यातील बानगे गावचा. गावामध्येच त्याने कुस्तीच्या सरावाला सुरुवात केली. सध्या तो पुण्यातील आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटमध्ये सराव करत आहे. उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जॅक्सन फॉरेस्टकडून त्याला निसटता पराभव पत्करावा लागला. यापूर्वीही त्याची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली होती, तर गेल्या महिन्यात आशियाई स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते.राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने सलग दोनवेळा सुवर्णपदक मिळवले आहे. त्याच्या खेलो इंडिया स्पर्धेतील लढती नेत्रदीपक ठरल्या होत्या. त्यामध्ये त्याने ५५ किलो फ्री स्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. अंतिम कुस्तीमध्ये त्याने हरियाणाच्या सुरिंदरला अवघ्या ४० सेकंदात चितपट केले होते. त्याला सैन्यदलातील अमर निंबाळकर, विनायक दळवी, यांचे तर गावातील उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, तुकाराम चोपडे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूरच्या वैभव पाटीलला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 5:14 PM