घन:शाम कुंभार : यड्राव
हातात काठी, पाठीला मळकट पिशवी घेऊन लंगडत लंगडत अंधाऱ्या रात्री फिरणारी वृद्ध महिला पाहून अनेकांच्या तर्कवितर्कांना चालना मिळाली अन् तिच्या चौकशीसाठी लोकांची गर्दी झाल्याने ती भांबावली. याची माहिती मिळाल्याने माणुसकी फाऊंडेशनने 'मानवता' व खाकी वर्दीतील 'माणूस' जागा झाल्याने कोल्हापूरच्या भरकटलेल्या वृद्ध महिलेला आधार व मायेची ऊब मिळाली.
येथील गावठाण बेघर वसाहतीमध्ये रात्री साडेनऊच्यासुमारास कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराजवळ भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या या वृद्ध महिलेस कोल्हापुरात कोणीतरी मारहाण केली होती. त्या भीतीने व विस्मृतीमुळे ती भटकत-भटकत याठिकाणी पोहोचली. प्रारंभी नागरिकांनी तिची आस्थेने विचारपूस केली. त्यावेळी जमलेले लोक पाहून ती अधिकच भांबावून बडबडत होती. त्यातच सोशल मीडियावर लहान मुले पळविणारी टोळीतील वृद्ध महिला आपल्या भागात फिरत असल्याचा चुकीचा संदेश फिरल्याने नागरिकांमध्येही गैरसमज निर्माण होऊन भीतीचे व रोषाचे वातावरण निर्माण झाले.
नागरिकांच्या मनातील रोष पाहून सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण, उद्योजक औरंग शेख व पोलीस पाटील जगदीश संकपाळ यांनी नागरिकांची समजूत काढली आणि या वृद्ध महिलेला सुरक्षित ठिकाणी ठेवले. याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रकाश निकम व उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांनी ताबडतोब पोलिसांना घटनास्थळी पाठविले; तर उपनिरीक्षक यादव यांनी माणुसकी फाऊंडेशनचे प्रवीण केर्ले यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. यावेळी केर्ले यांनी या वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन समजूत घातली. रात्रीच्यावेळी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने शहापूर पोलिसांनी स्वत:च्या गाडीतून या वृद्ध महिलेला आधार केंद्रापर्यंत नेऊन पोहोचविले. माणुसकी फौंडेशनने दाखविलेली 'मानवता' व खाकी वदीर्तील 'माणूस' दिसून आला. यामुळे कोल्हापूच्या भरकटलेल्या वृध्द महिलेस आधार मिळाला. त्यामुळे शहापूर पोलीस ठाणे व माणुसकी फाऊंडेशनचे कौतुक होत आहे. यावेळी माणुसकी फाऊंडेशनचे शिवाजी भुयेकर, बबलू कोळी, सचिन भोसले, विशाल पवार, गणेश चोपडे यांचेही सहकार्य लाभले.
फोटो - ०९०२२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - कोल्हापूरच्या भरकटलेल्या वृध्देला माणुसकी फौंडेशन व पोलिसांनी आधार दिला.