केरळमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण, कोल्हापुरात मात्र खंडग्रासचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 06:52 PM2019-12-26T18:52:31+5:302019-12-26T18:54:40+5:30
देशाच्या कानाकोपऱ्यातून खगोल निरीक्षक प्रामुख्याने केरळ या ग्रहणपट्ट्यातील जवळच्या राज्यात बहुसंख्येने पोहोचले. पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून गेलेल्या विविध संस्था आणि व्यक्तींचा यात समावेश होता. कोल्हापुरात मात्र ढगाळ वातावरणामुळे सुरुवातीला अंशत: आणि नंतर खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. शिवाजी विद्यापीठात नॅनो सायन्स विभागाच्या छतावरून सुमारे ५०० हून अधिक खगोलप्रेमींनी सूर्यग्रहण पाहिले.
कोल्हापूर : देशाच्या कानाकोपऱ्यातून खगोल निरीक्षक प्रामुख्याने केरळ या ग्रहणपट्ट्यातील जवळच्या राज्यात बहुसंख्येने पोहोचले. पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून गेलेल्या विविध संस्था आणि व्यक्तींचा यात समावेश होता. कोल्हापुरात मात्र ढगाळ वातावरणामुळे सुरुवातीला अंशत: आणि नंतर खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. शिवाजी विद्यापीठात नॅनो सायन्स विभागाच्या छतावरून सुमारे ५०० हून अधिक खगोलप्रेमींनी सूर्यग्रहण पाहिले.
भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सूर्यग्रहण ८ वाजून ०४ मिनिटांनी सुरू झाले. त्याचा मध्य म्हणजे कंकणाकृती अवस्था ९ वाजून २२ मिनिटांनी सुरू झाली, ती तीन मिनिटे राहिली. १० वाजून ५९ मिनिटांनी सूर्यग्रहणाचा मोक्ष झाला.
कोल्हापुरातील कुतूहल फौंडेशन, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, खगोल मंडळ, शिवाजी विद्यापीठातील अवकाश विज्ञान विभागाच्या निरीक्षकांशिवाय डॉ. राजेंद्र भस्मे, किरण गवळी अशा हौशी खगोल निरीक्षकांनी केरळमधील विविध भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतील मिलिंद यादव, सलीम महालकरी, सचिन पाटील, उदय संकपाळ, रोहित कांबळे, अभय बकरे, शिवप्रभा लाड, आदींनी केरळ येथील मुझ्झकुन्नू येथून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले. सूर्यग्रहणाच्या पट्ट्यातील हा मध्यबिंदू होता. येथून तब्बल तीन मिनिटे १० सेकंद ग्रहण पाहायला मिळाले.
शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश निरीक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर, जयसिंगपूरचे डॉ. प्रशांत चिकोडे, पदार्थविज्ञान विभागाच्या प्रा. नम्रता कांबळे यांच्यासह पीएच.डी., एम.एस्सी. आणि बी. एस्सी. करणाºया विद्यार्थ्यांसह १२ जणांनी केरळमधील पायनूर येथून सूर्यग्रहण पाहिले. यावेळी सकाळी ८.0४ मिनिटांपासून ११.0४ वाजेपर्यंतच्या ग्रहणकाळात सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेवर कसा परिणाम होतो, याच्या नोंदी पायरॉनोमीटर या यंत्राद्वारे नोंदविल्या.
केरळमधील इरिटी येथून ज्यांनी सूर्यग्रहण पाहिले, त्यांत कुतूहल फौंडेशनच्या आनंद आगळगावकर, अनिल वेल्हाळ, सागर बकरे, अनिकेत कामत यांच्यासह २८ निरीक्षकांचा समावेश होता. कोल्हापूरचे डॉ. राजेंद्र भस्मे, समीर कदम, डॉ. सागर गोडांबे, सातारा येथील डॉ. बारटक्के यांनी केरळमधील कासारगौड-बेकलफोर्टजवळील पल्लीकेले या समुद्रकिनाºयावरून सूर्यग्रहण पाहिले.
कोल्हापुरातील खगोल अभ्यासक किरण गवळी, सांगलीचे खगोल अभ्यासक शंकर शेलार, संजय अष्टेकर, राहुल आमटे तसेच कोल्हापूरचे युवा खगोल निरीक्षक वैभव राऊत यांनी गुरुवारी केरळमधील कान्हांगड येथून या सूर्यग्रहणाचे दर्शन घेतले.
शिवाजी विद्यापीठात ग्रहण पाहण्यास गर्दी
शिवाजी विद्यापीठातील नॅनो सायन्स विभागाच्या छतावरून सूर्यग्रहण पाहण्याची सुविधा होती. येथे सकाळी सात वाजल्यापासूनच अनेक खगोल अभ्यासकांनी गर्दी केली. कुतूहल फौंडेशनने पुरविलेल्या खास चष्म्यांतून सुमारे पाचशेहून अधिक निरीक्षकांनी हे खंडग्रास पद्धतीचे सूर्यग्रहण पाहिले. विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील अवकाशविज्ञान शाखेच्या सुप्रिया कांबळे, अश्विनी पाटील, रोहन कांबळे, श्रीधर कांबळे, मीनाज फरास, सत्यजित पाटील, उमेश शेमडे, सनी गुरव, राहुल रेडेकर, प्रमोद नवलगुंदे, ‘नॅनो सायन्स’चे प्रा. मुकेश पाडवी यांनी सौरचष्मे, पिनहोल्स प्रोजेक्टरच्या साहाय्याने या सूर्यग्रहणाचा अनुभव निरीक्षकांना मिळवून दिला. येथून ८० टक्के सूर्यग्रहण पाहायला मिळाले.