लोकमत न्यूज नेटवर्क
कोडोली : पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कोडोली ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणूक चर्चेस उधाण आले आहे. जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व माजी आमदार पाटील हे प्रतिस्पर्धी गट एकत्र आले आहेत पारंपरिक गट एकत्रित आल्याने या गटाची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये एकमेकांची चढाओढ चालू आहे. या गटाची उमेदवारी मिळाल्यास विजयासाठी जास्त राबावे लागणार नाही, अशी कार्यकर्त्यांची धारणा झाली आहे.
पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीत कोरे पाटील गटात समझोता झाल्याने ग्रामपंचायत निवडणुका या दोन्ही गटाकडून एकत्र लढणार असल्याचे आधीपासून स्पष्ट होते. सध्या कोरे, पाटील गटाविरोधात भाजप, शिवसेना व शेतकरी संघटना अशी लढत होणार असे दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका बिनविरोध करण्यास विरोधी गटाची तयारी असल्याचे बोलले जात आहे .
सध्या येथे ५० हजारच्या आसपास लोकसंख्या आहे, तर २१,८४० इतके मतदार आहेत. कोडोलीसह परिसरातील अनेक लोक नोकरी, व्यवसाय, शाळा अशा विविध कारणाने येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तरलता लोकसंख्येचे प्रमाण जादा आहे. मतदार यादीत नोंद असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय निधी मिळत असल्याने विकासकामे चांगल्याप्रकारे करण्याकरिता चांगले उमेदवार शोधण्यासाठी नेत्यांची कसोटी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत डॉ. कोरे यांनी जि. प. चे माजी सभापती अमरसिंह पाटील यांच्याशी पाठिंब्याबाबत संधान बांधले. त्यावेळेपासून येथे मैत्रीचे पर्व सुरू झाले. पर्यायाने अमरसिंह पाटील यांचा दबदबाही वाढला. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील हेही अमरसिंह पाटील यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकमेकांमध्ये कोणाचे किती उमेदवार असणार, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार, का कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समझोता होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चौकट
१ ) कोडोली येथे ६ गट असून एकूण सदस्यांची संख्या १७ इतकी आहे. प्रत्येक गटात सरासरी तीन हजारच्या आसपास मतदार आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीचे चित्र काय असणार, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २) १७ जागांसाठी ९८ अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये १ अर्ज अवैध ठरल्याने एकूण उमेदवारांची संख्या ९७ इतकी झाली आहे.