कोल्हापूर : हैदराबाद येथे झालेल्या आॅल इंडिया डीलर पॅनेलच्या बैठकीत सामाजिक कार्याबद्दल कोरगांवकर पेट्रोल पंप व कोरगांवकर ट्रस्टचा विशेष गौरव करण्यात आला. एचपी कंपनीच्या अध्यक्षा निशी वासुदेव यांच्या हस्ते या पंपाचे मालक अमोल कोरगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस भारतातील विविध पेट्रोल पंपांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतातील उच्चांकी विक्री करणाऱ्या पेट्रोल पंपांत गणना असणारा कोरगांवकर पेट्रोल पंप आपल्या नफ्यामधून २५ टक्के नफा हा समाजातील दुर्बल घटकांवर खर्च करतो. यामध्ये त्यांच्या वतीने केल्या जाणाऱ्या गरजू, अंध, अपंग, वयोवृद्ध व्यक्तींना उपचारांसाठी आर्थिक मदत, मोफत रोपांचे वाटप, नैसर्गिक आपत्तीवेळी २४ तास मोफत अॅम्ब्युलन्स सेवा, गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मदत, दुष्काळग्रस्तांना पाणीवाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार अशा विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. या सर्व सामाजिक कार्यांची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला. बैठकीत पंपधारकांनी पेट्रोल पंप कसा चालवावा, ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. पंपधारकांच्या समस्या व त्यांवरील उपाय यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी एचपीसीएल कंपनीचे जीएसव्ही प्रसाद, जयकिशन, रजनीश मेहता, एस. एम. गावडे, जयकिशन यांच्यासह देशभरातील पेट्रोल पंपचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोरगांवकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव
By admin | Published: March 04, 2016 12:42 AM