कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांना कोथिंबीर मातीमोल किमतीने विकावी लागली. एक रुपया पेंढीचा दर झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कोंथिबीर बाजार समितीत फेकून दिल्याने भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबीरचे ढीग पसरले होते.
खरीप काढणीनंतर पालेभाज्यांसह कोथिंबीरची आवक दरवर्षी वाढत असते. आडसाल लागणीसह भातकापणीनंतर करण्यात येणाऱ्या ऊस लागणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोथिंबीर घेतली जाते. त्यामुळे एकदमच आवक वाढली आहे. परिणामी बाजारात कोथिंबीरच्या दरात घसरण होतेच पण यावर्षी आवकेत मोठी वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात रोज सरासरी १७ हजार पेंढ्याची आवक व्हायची, दर साधारणत: तीन रुपयांपासून सहा रुपये पेंढीपर्यंत होता. या आठवड्यात वाढ होऊन ती आता २८७०० पेंढ्यापर्यंत पोहोचल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे.
एक ते तीन रुपये पेंढीचा दर झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आवक वाढली आणि मागणी नसल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळीत किरकोळ बाजारात ३० रुपये पेंढीचा दर होता.
दर पडल्याने मंगळवारी कोल्हापूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी कोथिंबीर तशीच टाकून घरी जाणे पसंत केले. त्यामुळे भाजीपाला मार्केट मध्ये कोथिंबीरचे ढीग पडले होते, अखेर समिती प्रशासनाने ट्रॉलीत भरून कचऱ्यात टाकली.
मेथी रस्त्यावर...!
दोन आठवड्यांपूर्वी दहा रुपये पेंढी असणारी मेथीच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. दहा रुपयांना चार पेंढ्या दर झाला असून कोल्हापूर शहराच्या मुख्य रस्त्यावर विक्रीसाठी मेथीचे ढीग लावलेले दिसत आहेत.
तुलनात्मक दर असे-
तारीख आवक पेंढी प्रति पेंढीचा दर रुपयात
- १४ आॅक्टोबर २५ हजार २४३ ५ ते २५
- १५ आॅक्टोबर ११ हजार २०० ५ ते २५
- १६ आॅक्टोबर २५ हजार ५ ते २०
- १७ आॅक्टोबर ७ हजार ३०५ ४ ते २०
- १९ आॅक्टोबर ४ हजार ८ ते २०
- २७ नोव्हेंबर १७ हजार ५०० ३ ते ६
- ५ डिसेंबर २८ हजार ७०० १ ते ३