केर्ली फाटा ते नांदारी हा मार्ग अनुस्कुराकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. या रस्त्याचे काम सध्या तरी अत्यंत सुस्थितीत आहे, तर आ. विनय कोरे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामासाठी ए.डी.बी. योजनेतून २०६ कोटींची मंजुरी मिळाल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या कामाचा लवकर शुभारंभ होणार असल्याचे सांगितले जाते. यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण व गटारी होणार आहेत; परंतु सध्या या मार्गावर अर्थसंकल्प योजनेतून सन २०१८/१९ सालचा तीन कोटींचा निधी कोतोली ते अनुस्कुरा फाट्यापर्यंतच्या जागोजागी खराब झालेल्या सात किलोमीटर अंतरासाठी खर्च करण्यासाठी धांदल सुरू झाली आहे. या मार्गावर या योजनेतून गटारींचे कामदेखील काही प्रमाणात करण्यात आले आहे, तर अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. मात्र, ए.डी.बी. योजनेतून या रस्त्यावर काही महिन्यांत मोठा निधी खर्च केला जाणार असल्याचेदेखील सांगितले जात आहे. हे काम सुरू झाल्यावर मात्र सध्या सुरू असलेले काम मातीमोल ठरणार आहे. त्यामुळे परिसरातील इतर रस्ते जीवघेणे ठरत असताना सुस्थितीत असलेल्या मार्गावर निधी खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फोटो : कोतोली ते अनुस्कुरा फाटा (नांदारी) मार्गावर जागोजागी चांगल्या रस्त्यावर कारपेट डांबरीकरणाचे काम सुरू आहे.